सदानंद सिरसाट, बुलढाणा : सोमवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वारा आणि पाऊस व गारपिटीने तालुक्यातील गहू, हरभरा, मका, संत्रा, लिंबू आणि ज्वारी पिकाचे एकूण ३७९१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील सुनगाव, जामोद, उसरा, चालठाणा, खेर्डा बु, खेर्डा खुर्द, हिंगणे बाळापूर, दादुलगाव, गौलखेड, पिंपळगाव काळे, आडोळ, मांडवा तसेच आदिवासी भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला रब्बी पिकाचा घास निसर्गाच्या तांडवाने हिसकावून घेतला. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळून नुकसान झाले. तसेच काही गावातील घरावरील तीन पत्रे उडाली. तर झाडे पडून नुकसान झाले. तसेच जळगाव ते जामोद रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. अद्यापही ती तशीच पडून आहेत. जळगाव आणि खेरडा रोडवरही झाडे कोसळली. अनेक ठिकाणी वीज खांबाच्या तारा तुटून पुरवठा खंडित झालेला आहे.
या संदर्भात तातडीने उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार शीतल सोलाट, सहायक गटविकास अधिकारी संदीप मोरे आणि तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांनी तलाठी कृषीसेवक आणि सर्व ग्रामसेवकांना नुकसानीचे अहवाल देण्याबाबत सूचित केले. तर तहसीलदार सोलाट यांनी नुकसानी भागात जाऊन पाहणी केली.