लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत असून वीज पडून मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथे एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. डोणगाव परिसरात १२ घरांची पडझड झाली असून या दरम्यान डोक्यात दगड पडून एकजण जखमी झाला आहे. यासोबतच डोणगाव परिसरात शेकडो पोपटांचा मृत्यू झाला आहे.शनिवारी दुपारी बुलडाणा तालुक्यासह मोताळा तालुक्यातील तारापूरसह काही भागात पाऊस झाला. बुलडाणा शहरात हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडला. रात्री आठ वाजेच्या सुमारास बुलडाणा शहर परिसरात पुन्हा जोरदार पावसास प्रारंभ झाला. रात्री दरम्यान जिल्हास्तरावर या अवकाळी पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान खामगाव व नांदुरा तालुक्यातही या पावसाने मोठे नुकसान केले आहे. चिंचपूर आणि बोरीअडगाव या भागातही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.१९ मार्च रोजी चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, मोताळा, मेहकर तालुक्यात काही भागात गारपीट झाली होती. या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या प्रशासन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात गुंतले आहे.
जिल्हयात १.९ मिमी पावसाची नोंदशुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाची जिल्ह्यात सरासरी १.९ मिमी नोंद झाली आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यात ८.७ मिमी, चिखली ३.६ मिमी, मेहकर २.९ मिमी, सि. राजा दोन मिमी, खामगाव २.२ मिमी, मोताळा ३.६ मिमी, नांदुरा १.३ मिमी, याप्रमाणे नोंद झाली आहे. अन्य तालुक्यात तुलनेने तुरळक स्वरुपात हा पाऊस पडला.