अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: तालुक्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत तब्बल १२ तास संततधार अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे खामगाव तालुक्यातील शिराळा येथे एकाच मेंढपाळाच्या तब्बल २० मेंढ्यामृत्यूमुखी पडल्याचे समोर येत आहे. त्याचवेळी खामगाव तालुक्यातील काही भागात आलेल्या या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचेही समोर येत आहे.
याबाबत सविस्तर असे की, रविवारी रात्री वादळी वार्यासह वीजेचा कडकडाट सुरू झाला. रात्री १०वाजता दरम्यान, संपूर्ण तालुक्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला असतानाच, तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात सापडली. त्याचवेळी शिराळा येथील सैलानी कृष्णाजी हटकर यांच्या २० मेंढ्या मुत्यूमुखी पडल्या. यात काही कोकरू आणि मोठ्या मेंढ्याचा समावेश आहे. त्याचवेळी हिवरखेड शिवारातही काही मेंढ्या दगावल्याचे समोर येत आहे.