लोकमत न्यूज नेटवर्कधाड : श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना शासनाच्या वतीने सुरू असून या योजनेत पात्र लाभार्थींना ६०० ते १००० रू. प्रती महिना आर्थिक मानधन देण्यात येते. मागील अनेक वर्षापासून वृध्द आणि निराधारांना आपले आर्थिक मानधन बंँकेत आले काय यासाठी बँकेत चकरा माराव्या लागत परंतु महसूल विभाग बुलडाणा यांचेवतीने मागील काही महिन्यांपासून संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थींचे आधार ंबर व मोबाईल नंबर लींक करून साधारण एप्रिल २०१७ पासून लाभार्थींच्या थेट खात्यात आॅनलाईन रक्कम पाठवण्याची सोय केल्याने आता लाभार्थीस मोबाईलवर मॅसेजव्दारे रक्कम जमा झाल्याची सुचना मिळत असल्याने या सुवीधेचे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.बुलडाणा तालुक्यात आजच्या घडीला संजय गांधी निराधार योजनेचे ४७८९ लाभार्थी तर श्रावण बाळ योजनेचे ११७४६ लाभार्थी असून यापैकी ८१ टक्के लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल नंबर लिंक करण्यात आले आहेत. पैकी वृध्द व निराधारांचे मोबाईल मिळणे कठीण असल्याने त्यांचे नात्यातील व्यक्तीचे नंबर लींक करण्यात येणार असल्याने भविष्यात प्रत्येक लाभार्थीस पैसे मिळाल्याची (बॅकेत आल्याची) माहिती वेळेवर होणार आहे. प्रत्येक महिन्याला महसूल विभागाकडून बुलडाणा तालुक्यात या योजनेतील लाभार्थींना १ कोटीपेक्षा अधिक निधी वितरीत होतो. राष्टÑीयकृत बँकेत वरील योजनांचे पैसे संबंधित व्यक्तीच्या खात्यात पडतात. पुर्वी ग्रामीण भागातील वयोवृध्द महिला व पुरूष आपल्या गावावरून पैसे खर्चुन लाभाचे पैसे आले किंवा नाही यातच वेळ व पैसा खर्ची घालत त्यामुळे तुटपुंजी मिळणारी रक्कम ही मोठ्या प्रयासाने त्यांना मिळायची यात वृध्दांना हकनाक त्रास सहन करावा लागायचा. सध्या घरपोच पैसे खात्यात पडत असल्याची माहिती मिळत असल्याने बँकेसमोरच्या गर्दीस आळा बसणार हे नक्की!
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील प्रत्येक लाभार्थीच्या आधार व मोबाईल लिंकींगचे काम सुरू आहे. लवकरच सर्वच लाभार्थ्यांना एसएमएस व्दारे माहिती मिळणार.- सुरेश बगळे, तहसीलदार, बुलडाणा