- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : वाढीव पाणीपुरवठा कार्यान्वित करताना खामगाव पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत अनेक भागात जलवाहिनीतून पाणी येण्याची नागरिकांची प्रतीक्षा कायम आहे. त्याचवेळी अवकाळी पाऊस पालिका प्रशासनाच्या मदतीला धावला. त्यामुळे गत बुधवारी अनेक भागातील नळांना अचानक पाणी आले.खामगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. मात्र, गत अनेक वर्षांपासून वाढीव पाणी योजनेचे काम रखडले आहे. गत पाच वर्षांच्या कालावधीतही या योजनेचे काम पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, संतविहार कॉलनीसोबतच शहराच्या काही भागातील नागरिकांच्या नळाला पाण्याचा एकही थेंब येत नाही. पाणीपुरवठा होत नाही. त्याचवेळी नळाच्या पाणीपट्टीचे देयक मात्र, या भागातील नागरिकांना विना विलंब पोहोचते. शहरातील अंतर्गत जलवाहिनी दुरुस्तीची समस्या जटिल बनली आहे. वर्ष-दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही जलवाहिनीची गळती दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे शहरातील नळांद्वारे दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्तीच होत नसल्याने, पावसाचे साचलेले पाणी जलवाहिनीद्वारे नळांना पोहोचत असल्याचे प्रकारही शहरात अनेकदा घडतात. पाणीपुरवठ्याच्या दिवशी नळांना एकही थेंब येत नसताना, पाऊस आल्यानंतर, तसेच सांडपाणी जलवाहिनीत शिरल्यानंतर काही भागातील नळांना पाणी येते. या समस्येबाबत वारंवार तक्रार केल्यानंतरही पालिकेतील दप्तर दिरंगाईमुळे जलवाहिनी दुरुस्ती आणि गळतीचे काम तक्रारीनंतर तब्बल दीड-दोन वर्षांपर्यंत पूर्णत्वास जात नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.
अवकाळी पाऊस आला खामगाव पालिकेच्या मदतीला धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 11:15 AM