सुलतानपूर : गत ४ दिवसापासून सुलतानपूर परिसरात अवकाळी पाऊस सायंकाळच्या ठरावीक वेळेत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सद्यस्थितीत सुलतानपूर व परिसरातील राजनी, धानोरा, शिवणी पिसा, अंजनी, खळेगाव, सोमठाणा, खापरखेड, कोयाळी , उदनापूर, कारेगाव , वडगाव , पारडी , बोरखेडी , वेणी , येसापूर व भानापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू आणि हरबरा सोंगणीला आला असून मका, ज्वारी, बिजवई कांदा जोमात आहे. परंतु अवकाळी पावसाने या पिकांची अक्षरशः वाट लावल्याने ही पिके जमिनीवर लोळवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे वार्षिक बजेट कोलमडल्याने ते शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहे. यंदा सुलतानपूर मंडळात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांच्या अंतिम आनेवारीचा अहवाल लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी शासनाकडे पाठवला हाेता. मात्र नापिकीची मदत आणि शेतकऱ्यांनी भरलेला हक्काचा विमा मिळणे अपेक्षित असताना विरोधक व सत्ताधारी यांनी चालवलेल्या कुरघोडीच्या राजकारणात या दोन्हींकडून बळीराजाच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.
सुलतानपूर मंडळात अतिवृष्टी होऊन खरीप पिकाची अंतिम आणेवारी ४७ पैशाच्या आत असल्याचा अहवाल वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविलेला आहे.
सैफन नदाफ
तहसीलदार लोणार