लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून ११ जुलै रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत नवे पर्व.. नवी दिशा.. नवे संकल्प या नावीण्यपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ गुड्डा-गुड्डी फलक अनावरणाने तालुक्यातील पाडळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हाभर २६ जुलैपर्यंत आरोग्य विभाग व महिला, बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. हा शुभारंभ जि.प अध्यक्ष उमा तायडे यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला आ. हर्षवर्धन सपकाळ, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जि.प उपाध्यक्ष मंगला रायपुरे, महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जालींधर बुधवत, मोहन पवार, रसुल खान, पं.स सदस्य तायडे, सरपंच शोभा पवार, श्रीकांत पवार आदी उपस्थित होते. यावेळी जि.प अध्यक्ष तायडे म्हणाल्या की, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील दीड लाख योग्य जोडप्यांच्या घरावर स्टीकर्स लावण्याचे व संदेश पत्र देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी मुलींच्या जन्माचे महत्त्व विषद करीत लोकसंख्या नियंत्रणाचे फायदे सांगितले. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी भारत व जगाच्या लोकसंख्येचा तुलनात्मक आढावा तसेच लोकसंख्या वाढीचे गंभीर परिणाम समजावून सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रायपुरे, सभापती महाले यांनी गर्भलिंग कायदा व मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन म्हणाले की, मुलीचा जन्म होणाऱ्या कुटुंबाने आपल्या घराजवळ जास्वंदाचे झाड लावावे. ज्या गावात जास्वंदाच्या झाडांची संख्या जास्त तेथे मुलींची संख्या जास्त असल्याची गावाची वेगळी ओळख निर्माण होईल. यावेळी पाडळी गावातील एक मुलगी व दोन मुली असणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच गावातील २० योग्य जोडप्यांच्या घरांवर स्टिकर्स मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आले. त्याचप्रमाणे निर्मला चंद्रभान पवार यांची मुलगी साक्षी चंद्रभान पवार हिच्याहस्ते जास्वंदाचे झाड लावण्यात आले. तसेच एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या छाया चंद्रकांत जाधव यांच्या घरी जावून त्यांना जास्वंदाचे झाड सन्मान म्हणून देण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते ग्रामपंचायत भवनात लावण्यात आलेल्या गुड्डा-गुड्डी फलक, घरांवर लावावयाचे स्टीकर्स, तसेच अन्य फलकांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. गोफणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेषराव काळवाघे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘बेटी बचाओ’चा संदेश देणाऱ्या गुड्डा-गुड्डी फलकाचे अनावरण
By admin | Published: July 14, 2017 12:47 AM