बुलढाणा : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, तसेच शिक्षकांसह विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत व्हावी, यासाठी सुरू केलेल्या यु डायस प्रणालीमध्ये माहिती भरण्याकडे राज्यातील २५ हजार ७८८ शाळांनी शिक्षकांची माहिती भरण्यास सुरूवात ही केली नाही. त्यामुळे,या शाळांना आता ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली असून माहिती न भरणाऱ्या शाळेतील शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी दिले आहेत.
राज्यातील मान्यता प्राप्त शाळांनी त्यांची माहिती यू-डायस प्लस प्रणालीवर ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, राज्यातील २५ हजार ७८८ शाळांनी नोव्हेंबर संपत आला असला तरी माहिती भरण्यास सुरूवात ही केली नसल्याचे वास्तव आहे़ त्यामुळे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी २३ नोव्हेंबरला शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत ज्या शाळा माहिती अपडेट करणार नाही त्या शाळेतील शिक्षकांचे थांबवण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे, माहिती भरण्यासाठी चालढकल करणाऱ्या शाळांमध्ये खळबळ उडाली आहे.
१२ हजार ९४७ शाळांचा चालढकलयू-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार ८८. ०८ टक्के शाळांची भौतिक माहिती अद्ययावत केली आहे. तसेच ७६. २७ टक्के शाळांमधील शिक्षकांची तर ७१. ७० टक्के विद्यार्थ्यांची माहिती अंतिम केलेली आहे. १२ हजार ९४७ शाळा भौतिक माहिती भरण्यासाठी चालढकल करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, आता शिक्षकांचे वेतन थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
माहिती अद्यावत केल्याशिवाय वेतन नाहीयू-डायस प्लसवर माहिती अपडेट करण्यास विलंब होत असल्याने राज्य व केंद्र शासन सन २०२४-२५ व २०२५-२६ समग्र शिक्षा, स्टार्स् व पीएम री योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक सादर करण्यास विलंब होत आहे. जिल्हा व तालुका स्तरावरून वेतन पथकांनी या शाळांकडून यू -डायस प्लसवर शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची सर्व माहिती अद्ययावत केल्याचे मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करावे, त्यानंतरच वेतन अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.