लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शाळेची जागा भाड्याने देऊन मिळणाऱ्या निधीतून शाळा सुधारण्याचा उपक्रम बुलडाण्यात यशस्वी झाला. या संधीचे सोने करून शाळेचा कायापालट येथील नगर परिषद उर्दु शाळा क्रमांक दोनमध्ये झाला आहे. येथे डिजिटल अध्यापन पद्धतीवर भर देण्यात येतो. शाळेची सायन्स लॅब व परिसर अगदी खाजगी शाळांनाही लाजवणारा आहे.खाजगी शाळांच्या या स्पर्धेत उर्दु शाळेनेही आपली गुणवत्ता व प्रयोगशीलता जपली आहे. बुलडाणा येथील हाजी. सै. उस्मान से. मन्नु डोंगरे नगर परिषद उर्दु मिडील स्कूल क्रमांक दोनमध्ये पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आहेत. एकूण १० शिक्षक संख्या असलेल्या या शाळेची अल्पावधीतच झालेली प्रगती पाहून गतवर्षीपेक्षा यंदा विद्यार्थी संख्येतही वाझ झाली आहे. मागील शैक्षणिक वर्षात ३५२ विद्यार्थी होते, यंदा ३७५ विद्यार्थी आहेत. येथे सायन्स लॅब व अद्यायावत असे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. ज्याची विद्यार्थ्यांनाही भूरळ पडते. संगणक, प्रोजेक्टर डिजिटल रूम यामुळे आता शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी निर्माण झाली आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण याठिकाणी मिळते. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी झटतात. आता शाळा आयएसओ करण्याचा मानस आहे.-काझी रइसोद्दीन अलीमोद्दीनमुख्याध्यापक.
शाळेची प्रगती चांगली आहे. शाळेचा परिसर खाजगी शाळांनाही मागे टाकतो. सर्व शिक्षकांच्या मेहनतीचे हे फळ आहे.शाळेने नाविन्यता जपली आहे.- राणी बी बब्लू करेशी,शिक्षण सभापती, न.प. बुलडाणा.