मोताळा : मागील आठवड्यापासून तालुकाभरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, परिसरातील पिके तरारली आहे. त्यामुळे कापूस, मका व हायब्रिड पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताची मागणी वाढली आहे. मात्र कृषी संचालकांनी युरियाचा तुटवडा असल्याचे कारण देत शेतकर्यांची लूट चालविली असल्याची चर्चा शेतकर्यांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे. तालुकाभरात पाऊस झाल्यामुळे पिके डौलदार असली तरी, बर्याच शेतकर्यांच्या शेतात पाण्याचा निचरा न झाल्याने पिके पिवळी पडू लागली आहे. यासाठी युरिया खताची प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र मोताळा शहर व परिसरातील दुकानांमध्ये युरिया शिल्लक नसल्यामुळे व कृषी विभागाकडून उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मात्र दोन ते तीन दिवसांत युरिया मिळेल, असे सांगितले जात आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत २९८ रूपये असतांना छुप्या किमंतीत ४00 रूपयापर्यंंत विकल्या जात असल्याची ओरड शेतकरीवर्गातून होत आहे. मात्र याबाबत तक्रार करण्यास कोणीही समोर येत नाही. मागील काही दिवसांपासून मोताळासह परिसरातील कृषी केंद्रावर युरियाची विचारणा केली असता युरियाचा तुटवडा असल्याचे कारण सांगितल्या जात आहे. मात्र शहरालगतच्या काही गावामध्ये चढय़ा भावाने युरियाची विक्री करून शेतकर्यांना वेठीस धरल्या जात असल्याचे शेतकरी सांगत आहे. सर्वत्र युरियाचा तुटवडा असतांना ठरावीक गावामध्ये युरियाचा माल कोठून येतो व तो चढय़ा भावाने कसा विकला जातो हे न उलगडणारे कोडे आहे. परिसरात पावसाची सुरूवात झाल्यामुळे मका व हायब्रिड पिकांना युरिया खताची आवशकता असून, याच वातावरणात पिकांना खत देणे गरजेचे आहे. हे खत स्वस्त असल्यामुळे शेतकर्यांची ओढ युरियाकडे असते. मात्र युरियांच्या टंचाईचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. शेतकर्यांची लूट होवू नये यासाठी कृषी विभागाने मोहीम अधिकार्याकडे याबाबत जबाबदारी दिली आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे सर्वत्र युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
युरिया खताची कमतरता
By admin | Published: September 06, 2014 1:01 AM