बुलडाणा : मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनासाठी आलेल्या राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा जिल्हा दौरा भेटीगाठीतच उरकला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागाच्या मागण्यांना आरोग्य मंत्र्याच्या दौऱ्याने उजाळा मिळाला; मात्र आरोग्य मंत्र्यांनी कुठलीच मागणी किंवा निधी मंजूर न करता केवळ पोकळ आश्वासनांचा पाऊस पाडला. जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत; परंतु जिल्ह्यात राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा दौरा होणार असल्याने संपूर्ण प्रशासन कामाला लागले होते. त्याचबरोबर जिल्हावासीयांनासुद्धा आरोग्य मंत्र्याच्या दौऱ्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. तसेच तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकाळात पायाभरणी झालेल्या डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन १० मे रोजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेसच्या काळात पायाभरणी आणि भाजपा-शिवसेनेच्या काळात उद्घाटन झाल्याने श्रेय लाटण्याच काम झाल्याचे दिसून येते. ^डोणगाव येथील आरोग्य केंद्र यापूर्वीच सुरू झाले होते. या ठिकाणी रुग्णसेवाही सुरू होती; परंतु तरीसुद्धा पुन्हा लोकार्पण करण्याचा देखावा व या लोकार्पण कार्यक्रमाला आरोग्य मंत्र्याची हजेरी यामुळे विरोधकांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आले असता, त्यांनी कुठल्याच प्रकारच्या निधीची मंजुरात न करता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये यांना केवळ भेटीच दिल्या. तसेच मेहकर उपजिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर निधी देण्यासाठी प्रयत्न करणार, रिक्त असलेल्या जागा भरण्यात येतील, आशा वर्कर यांचे मानधन वाढविणार, अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करणार आदी आश्वासने देण्यात आली. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या या दौऱ्याने जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या समोर आल्या. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या अचानक भेटीदरम्यान या परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सदर प्रा.आ. केंद्राला विविध सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मिळेल, व आरोग्य केंद्राचा कायापालट होईल, अशा अपेक्षा असताना मंत्री महोदयांनी तसे कोणतेच आश्वासन न देता धावत्या भेटीचा सत्कार घेऊन ते पुढील दौऱ्यासाठी लगेच निघून गेले.
भेटीगाठीतच उरकला मंत्र्यांचा दौरा!
By admin | Published: May 13, 2017 4:46 AM