लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर, पाठ्यपुस्तक महामंडळाने मोफत पुस्तकांचा पुरवठा केला आहे. या पुस्तकांचे वाटप शाळास्तरावर सुरू झाले असले, तरी सध्या सुरू असलेल्या सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी पाहता, विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचा अभ्यासक्रमासाठी ऑगस्टमध्येच वापर करावा लागणार असल्याचे वृत्त आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पडतील, अशी व्यवस्थाही केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या नसतील, तरी ऑफलाइन व ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या, पण पाठ्यपुस्तक महामंडळाकडून उशिराने पुस्तके देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे गेल्या वर्षाची जुनी व चांगल्या स्थितीतील पुस्तके पुन्हा विद्यार्थ्यांकडून जमा करून त्याचे वाटप करण्यात आले. या पुस्तकांचे केंद्र स्तरावर वाटप सुरू झाले असले, तरी त्याचा वापर मात्र ऑगस्टमध्येच करण्यात येणार आहे.जून महिन्यापासून सुमारे ४५ दिवस सेतू अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. सध्या शिक्षकांना देण्यात आलेल्या सेतू अभ्यासक्रमाच्या आधारेच विद्यार्थ्यांची उजळणी करून घेतली जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो पूर्ण करायचा आहे.
नवीन पाठ्यपुस्तकांचा वापर ऑगस्टमध्येच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 12:33 PM