रफिक कुरेशी / मेहकर
शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंंत पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर शासकीय जाहिराती रंगविण्याचे काम सुरु आहे. मात्र त्यासाठी कर्नाटकमधील छायाचित्र वापरले जात असून, छायाचित्रावरील भाषा कन्नड असल्याने, लाखो रूपयांच्या या खर्चातून मूळ उद्देश साधला जात नाही. राज्य शासनाने औरंगाबाद येथील मानव विकास आयुक्तालयाकडून मराठवाडा, विदर्भातील मानव विकास योजनेच्या एसटी बसगाड्यांवर मानव विकासाशी संबंधित शासकीय योजनांच्या जाहिराती रंगविण्याचे काम घेतले आहे. सद्यस्थितीत हे काम मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. या जाहिरातींमध्ये शिक्षकांच्या योजना, आरोग्य, बालकल्याण, तसेच उत्पन्न वाढीच्या योजनांसह विद्यार्थी व शेतीसंबंधीच्या विविध १४ योजनांचा समावेश आहे. या जाहिरातीवर शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. एस.टी. महामंडळाच्या बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर आगारात मानव विकास योजनेच्या १५ बसगाड्या आहेत. या बसमधून ग्रामीण भागातील विद्यार्थीनींचा मोफत प्रवास सुरु आहे. शासनाच्या या जाहिरातींमध्ये विविध योजनांची माहिती व त्यासंबंधीची छायाचित्रे समाविष्ट आहेत. ही छापील छायाचित्रे शासकीय यंत्रणेने चित्रकाराकडे दिली आहेत. परंतु ही छायाचित्र कर्नाटकमधील असून, त्यावरील मजकूर कन्नड भाषेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना सदर जाहिराती समजण्यास अडचण जात आहे. ही जाहिरात मानव विकासच्या राज्यातील २ हजार ५00 एसटी बसगाड्यांवर रंगविण्यात येत असल्याची माहिती आहे. या बसगाड्यांवरील जाहिरातीतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्नाटकातील छायाचित्र व त्यावरील कन्नड भाषेतील मजकूर पाहून लोकांना हसू फुटत आहे.