- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात गत काही महिन्यांमध्ये चक्क खासगी वाहनांना रूग्णवाहिकांम्हणून वापर करण्याच्या प्रमाणात वाढ झालीय. कोरोना विषाणू संक्रमन कालावधीत रूग्णवाहिकांचा तुटवडा लक्षात घेता काहींनी खासगी वाहनांनाच रूग्णवाहिका केल्याचे समोर येत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी(पासींग) आणि फिटनेस प्रमाणपत्र न घेताच अनेक बनावट रूग्णवाहिका रस्त्यांवर धावत असल्याचे समोर येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षांपासून रूग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहेत. गरज लक्षात घेता काही रूग्णवाहिका संचालकांकडून दर वाढ करण्यात आल्याचेही प्रकार मध्यंतरी घडलेत. कोरोना कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि संबंधित विभागाचे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता, काहींनी रूग्णवाहिकांचा बाजार मांडल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी चक्क खासगी वाहनांचा रूग्णवाहिका म्हणून वापर सुरू केला असून, यातील अनेक वाहने चक्क सामान्य रूग्णालयाच्या आवारात उभी राहतात. याकडे कुणाचेही लक्ष आणि नियंत्रण नसल्यामुळे खामगाव, बुलडाणा, नांदुरा, चिखली आणि, मलकापूरसह आदी शहरात खासगी (नियमबाह्य) रूग्णवाहिकांचे पेव फुटले आहे. वाहनांवर दिवा लावून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगी विनाच काही खासगी वाहने रूग्णवाहिका म्हणून रस्त्यावर धावताहेत. खासगी रूग्णालये, सामाजिक संस्थांसोबतच राजकीय पक्षाच्या रूग्णवाहिकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असून, खामगाव शहरातील अनेक रूग्णवाहिकांच्या फिटनेस प्रमाणपत्राचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही खासगी रूग्णालयाच्या संचालकांकडून रूग्णवाहिकांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचीही चर्चा आहे.
ऑनलाइन तपासणीकडे दुर्लक्ष! रस्त्यांवर चालणारी वाहने इष्टतम परिस्थितीत कार्यरत आहेत याची खात्री करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियम निश्चित केले आहेत. जे वाहन मालकांना त्यांच्या वाहनासाठी, त्याच्या आरोग्याशी संबंधित काही प्रमाणपत्रे देण्याचे बंधन घालतात. असेच एक अत्यंत महत्त्वाचे प्रमाणपत्र म्हणजे वाहन फिटनेस प्रमाणपत्र. मोटार वाहन कायदा, १९८९ नुसार, वाहनाची नोंदणी वैध मानली जाते, जर वाहनाकडे त्याच्या नावाचे वैध वाहन फिटनेस प्रमाणपत्र असेल. वाहनांसाठी तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र हे शासनाने जारी केलेले दस्तऐवज आहे जे वाहनांच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने वाहने रस्त्यावर चालविण्यास योग्य असल्याचे सांगते. कायद्यानुसार, व्यावसायिक वाहनांसाठी तसेच खाजगी वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.