मेहकर: तालुक्यातून येथील ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. परंतू ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पदासह अनेक महत्त्वाचे पद रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने कर्मचाऱ्यांना काम करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दररोज ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. परंतू रुग्णालयात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अनेक वर्षापासून भरले गेले नाही. कोरोना विषाणू संसर्ग येण्यापूर्वी या रुग्णालयात ३०० ते ४०० पर्यंत रोज येणाऱ्या रुग्णांची नोंद होत होती. मात्र आता फक्त १०० च्या आत येणाऱ्या रुग्णांची नोंद आहे. या रुग्णालयात महत्वाचे पद वैद्यकीय अधीक्षक यांचे आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सारंग हे दोन ते तीन वर्षांपूर्वी रुजू झाले होते. रुजू झाल्यानंतर परत ते त्यांच्या गावी गेले असून मागील दोन वर्षापासून ते रुग्णालयातच आले नाहीत. ते रजेवर गेल्याचे सांगण्यात आलेले आहे. वैद्यकीय अधीक्षक या महत्त्वाच्या पदावर डॉक्टर नसल्याने रूग्णालयात नियंत्रण ठेवणारा कोणीच दिसत नाही. डॉक्टर श्याम ठोंबरे हे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.
१७ पदे रिक्त
वैद्यकीय अधीक्षक पदासोबतच नर्स परिचारिका पद चार, एन.आर.एच.एम लसीकरण दोन, एन. बी. एस. यू. एक, आर.बी.एस.के एक, वैद्यकीय अधिकारी एक, आयुष्य वैद्यकीय अधिकारी दोन, सिकल टेक्निशन एक, दंतचिकित्सक, लॅब असिस्टंट, स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, भूलतज्ञ प्रत्येकी एक असे एकूण १७ पदे रिक्त आहेत.
मशीन धूळखात
रुग्णालयात बाल रोग तज्ञ, भूलतज्ञ व स्त्री रोग तज्ञ म्हणून काही डॉक्टर काम पाहत असले तरी आतापर्यंत त्यांना रुजू करण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यापासून त्यांना वेतन सुद्धा देण्यात आले नाही. रुग्णालयात एक्स रे नवीन मशीन व इतर साहित्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. मात्र आतपर्यंत याकडे लक्ष देण्यात आले नाही.