अंढेरा : बुलडाणा जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर १८ ते ४४ वयोगटातील कोविड लसीकरणाला महाराष्ट्र दिनानिमित्ताने प्रारंभ करण्यात आला. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील एकमेव अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पहिल्याच दिवशी ऑनलाईन नोंदणी केलेल्या तब्बल ८० जणांना लसीकरण करण्यात आले. यावेळी लस घेण्यासाठी तरुण व युवकांमध्ये उत्सुकता होती.
अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर गीते यांच्या पाठपुराव्याने अंढेरा येथे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. १८ ते ४४ वयोगटासाठी जिल्हातील पाच ठिकाणांपैकी अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जिल्हा परिषद शाळेत कोविड नियमांचे पालन करत १ मेपासून युवकांसाठी लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी देऊळगाव राजा पंचायत समिती सभापती रेणुका बुरकुल यांच्या हस्ते फित कापण्यात आली. या केंद्रावर निरीक्षण कक्ष, नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष, प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आले असून, फिजिकल डिस्टन्सिंग, हॅण्ड सॅनिटायझर तसेच मास्कचा नियमितपणे वापर करत या केंद्रावर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य शारदा सानप, गणेश बुरकुल, प्रमोद सानप, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर गीते, डाॅ. पूजा गाताडे, डॉ. अमोल सानप तसेच लताबाई सानप उपस्थित होते. या लसीकरणासाठी कमला भानुसे, राधा मुंढे, कविता काकड, सुमित्रा बुरकुल व अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.