बुलडाणा जिल्ह्यात ७२ शासकीय केंद्र आणि १६ खासगी रुग्णालयामध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रारंभी मोजक्याच चार केंद्रावर लसीकरण करण्यात येत होते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने याची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता पुन्हा तिसऱ्या टप्प्यात मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत ६१ हजार ८५० जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ६,२१७ दुर्धर आजार असणारे आणि ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या २६ हार ९२५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. हा लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
--रविवारीही होणार लसीकरण--
यापूर्वी रविवारी जिल्ह्यात लसीकरण होत नव्हते. आता रविवारीही लसीकरण करण्यात येणार असल्याचे संकेत आरोग्य विभागातील सूत्रांनी दिले. त्यानुषंगाने सध्या नियोजन सुरू आहे. २२ मार्च रोजी यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आरोग्य विभागाने घेतली असून प्रसंगी या रविवारपासूनच यास प्रारंभ होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.