लोकमत इम्पॅक्ट
नवीन मोदे
धामणगाव बढे : गेल्या काही दिवसांपासून ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाच लस देण्यात येत होती. त्यामुळे ४५ वर्षाच्या आतील फ्रन्टलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्यांना लस देण्यात येत नव्हती. यासंदर्भात लोकमत मध्ये ९ एप्रिल रोजी ४५ वर्षाच्या आतील नागरिक लसीकरणापासून वंचित या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच ही अट शिथिल करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणासाठी फ्रन्टलाईन वर्कर व हेल्थ वर्कर यांच्यासाठीची सुविधा पूर्ववत करण्यात आली आहे. आता योग्य पुरावे देऊन लसीकरण करता येईल, अशा सूचना जिल्हा आरोग्य विभागातर्फे संबंधितांना देण्यात आल्या आहे. ३ एप्रिलपासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये ४५ वर्षावरील व्यक्तींनाच कोरोना लसीकरणासाठी पात्र समजले जात होते. लसीकरण नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याप्रमाणे बदल करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो फ्रन्टलाईन वर्कर, हेल्थ वर्कर, विविध शासकीय कर्मचारी हे वयाच्या अटीमध्ये बसत नसल्यामुळे लसीकरणापासून वंचित राहत होते.
याविषयीचे वृत्त लोकमतमध्ये ९ एप्रिल रोजी प्रसारित झाले होते. त्याची दखल घेत जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने फ्रंटलाईन वर्करसाठीची लसीकरणाची सुविधा पूर्ववत केली आहे. लसीकरण सुरू असलेल्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना त्याविषयी सूचना देण्यात आली आहे. परंतु लसीकरण नोंदणीच्या वेळेस पुरावा अपलोड करणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता फ्रन्टलाईन वर्करमध्ये असलेले विविध घटक व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश नारखेडे यांनी यास दुजोरा दिला आहे.