बुलडाणा : काेराेनामुळे मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. सहा महिन्याच्या या कालावधीत लहान बालकांचे लसीकरणही रखडले हाेते. खासगी रुग्णालये बंदच असल्याने जवळपास ८० टक्के लसीकरण रखडले आहे. दुसरीकडे शासकीय रुग्णालयांमध्ये काेराेना काळातही लसीकरण करण्यात आल्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
निरोगी आयुष्य जगता यावे, विविध प्रकारच्या आजारांपासून, विषाणूंपासून संरक्षण व्हावे, यासाठी मूल जन्माला आल्यापासून त्याचे वय १६ वर्षे होईपर्यंत टप्प्याटप्प्याने लसीकरण करावे लागते. मूल जन्माला आल्यानंतर लगेच क्षयरोग प्रतिबंधक (बी.सी.जी.) लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचली जाते. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते. बाळ दीड महिन्याचे झाल्यानंतर त्रिगुणी (ट्रिपल) लस टोचली जाते. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. या लसीसोबतच बाळास पोलिओ प्रतिबंधक लसीचा पहिला डोज द्यावा लागतो. गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार असून, त्यासाठी गोवर प्रतिबंधक लस मूल ९ ते १२ महिन्यांचे असताना टोचली जाते. ६ महिने ते ३ वर्षे या वयात ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव असतो. त्यामुळे या काळात ‘अ’ जीवनसत्त्वाचे डोज बाळाला पाजले जातात. त्याच्या दैनंदिन आहारात पपई, गाजर, हिरव्या पालेभाज्याही असाव्या लागतात.
दरम्यान, वयाच्या ठरवून दिलेल्या टप्प्यांवर लसीकरण करणे आवश्यक असते; अन्यथा मूल निरनिराळ्या आजारांना बळी पडू शकण्याचा धोका असतो. असे असताना कोरोनाच्या संकटकाळात जन्मलेल्या व खासगी दवाखान्यांवर विसंबून राहणाऱ्या अनेक पालकांनी मुलांचे लसीकरण करून घेतलेले नाही. जिल्ह्यात हे प्रमाण २० टक्क्यांच्या आसपास आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे.
२०१९ मध्ये लसीकरण पूर्ण
२०१९ या वर्षांत जिल्ह्यात लहान मुलांना सर्व प्रकारच्या लसी देण्यात आल्या होत्या. काेराेनामुळे २०२० मध्ये मात्र ते कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुलांची रोग प्रतिकारशक्ती चांगली नसल्यास त्यांना विविध स्वरूपातील आजार होऊ शकतात. त्यापासून संरक्षण होण्यासाठी ठरवून दिलेले लसीकरण अत्यावश्यक आहे.
- डॉ. याेगिता शेजाेळ, बालरोगतज्ज्ञ.