जनावरे चोरी जाण्याच्या घटना वाढल्या
बुलडाणा : गत काही दिवसांपासून परिसरातील ग्रामीण भागातून शेतकऱ्यांची पाळीव गुरेढोरे चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तक्रारीनंतरही या गुराढोरांचा शोध मात्र लागला नाही. बुलडाणा जिल्ह्यातील अन्य भागातही गुरे चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.
योजनांमध्ये जिल्हा पिछाडीवर
बुलडाणा : कृषी विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या पोकरा, रोजगार हमी योजनेसह विविध उपक्रमांत बुलडाणा जिल्हा पिछाडीवर असल्याचे दिसून येते. कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दुबार पेरणी केलेल्यांना मदतीची प्रतीक्षा
बुलडाणा : पेरणीनंतर पावसाने जिल्ह्यात दडी मारली होती. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. या दुबार पेरणी करणाऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पीककर्ज परतफेडीस मुदतवाढ
बुलडाणा : राज्यभरात पीककर्जाची परतफेड जूनअखेरपर्यंत करावी लागते. जे शेतकरी जूनअखेरपर्यंत परतफेड करतात, त्यांनाच व्याज माफीची सवलत मिळते. मात्र, यावेळी कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या पीककर्जाची परतफेड करण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे.