तालुक्यात कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असताना बाधीतांवर उपचारात उपयोगी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन तुटवड्याने रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड सुरू असतानाच दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लस (कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन) या लसींच्या पुरवठा न झाल्याने तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्र ठप्प पडली आहेत. तालुक्यात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असताना अचानकपणे लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणास इच्छूक अनेकांचा हिरमोड झाला आहे. कोणत्याही केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने अनेकांना आल्या पावली परतावे लागत आहे. प्रारंभी लसीकरणाबाबत असलेली अनास्था आता दूर झाली असून नागरिक स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेत आहेत. यामुळे तालुक्याला मिळालेले सर्व डोस संपलेले आहेत.
एकूण २१ केंद्र पडले ठप्प !
चिखली तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात एकूण २१ केंद्रांवरून लसीकरणाची सुविधा करण्यात आलेली आहे. या केंद्रांवरून आतापर्यंत शहरी भागात ७ हजार २७, तर ग्रामीण भागात ८ हजार ६२६ असे एकूण १५ हजार ६५४ जणांचे लसीकरण झाले आहे. यातील अनेकांना लसीचा दुसरा डोस देखील देण्यात आला आहे.
शनिवार, रविवारी लसीकरण केंद्र बंद राहण्याची शक्यता !
शहरासह तालुक्यातील लसीकरण केंद्र शनिवार व रविवारी बंद राहण्याची शक्यता आहे. तालुक्यातील लसीकरणासाठी सबंधीत विभागाकडे स्थानिक प्रशासनाने लसींची मागणी नोंदविलेली आहे. मात्र, ती उपलब्ध होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने आणखी दोन लसीकरण केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे.
तालुक्याला हवा मोठा साठा !
लसीकरणाच्या पहिला टप्प्या प्रामुख्याने ६० वर्षे वयोगटातील नागरिकांचा समावेश होता. मात्र, आता ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. या वयोगटातील नागरिकांची संख्या तालुक्यात १ लाखापेक्षा अधिक आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण १०० टक्के यशस्वी करावयाचे झाल्यास तालुक्याला लसींचा मोठा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सर्वच केंद्रावरील साठा संपला. लसीची उपलब्धता दोन ते तीन दिवसांमध्ये करून नागरिकांना त्याबाबत अवगत केले जाईल. ४५ वर्षे वयोगटातील सर्व नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे.
अजितकुमार येळे
तहसीलदार तथा इन्सीटेंड कमांडर चिखली