येथील ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथे दिव्यांगाचे कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दिव्यांगांना लसीकरण केंद्रात ताटकळत बसण्याची वेळ येऊ नये, दिव्यांगांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना लस मिळावी, यासाठी लसीकरण सप्ताह राबविण्यात येत आहे. दिव्यांगांना रॅपिड तपासणी आणि कोरोना लस देण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांग लसीकरण मोहिमेबाबत मेहकर तालुका समन्वय अधिकारी प्राचार्य पंढरीनाथ शेळके, मेहकर नगरपालिका मुख्याधिकारी सचिन गाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. ठोंबरे यांची २४ जूनला बैठक झाली. यावेळी लसीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. दिव्यांग लसीकरण २८ जून ते ३ जुलै या कालावधीत प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. मेहकर शहरातील १८ वर्षांवरील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीचे लसीकरण करण्याचे नियोजन यामध्ये करण्यात आले आहे. आलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तीला रांगेत न थांबवता ताबडतोब लस दिल्या जाईल, असे मेहकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. ठोंबरे यांनी सांगितले.
लसीकरणासाठी मेहकर शहरातील सेवाभावी संस्था, समाजसेवक, तरुण, शिक्षक, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर, न. पा. कर्मचारी, अधिकारी हे या सप्ताहात १०० टक्के सहकार्य करतील. सर्वांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.
सचिन गाडे, मुख्याधिकारी, नगरपालिका मेहकर.
दिव्यांग प्रमाणपत्र, आधारकार्डचे बंधन
दिव्यांग लाभार्थीनी येताना अपंग प्रमाणपत्र व आधारकार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे. मेहकर येथील सर्व दिव्यांगानी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग लसीकरण मोहिमेचे तालुका समन्वय अधिकारी प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी केले आहे.