बुलडाणा : जागतिक पातळीवर दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे वर्षभरापासून सगळे त्रस्त आहेत. यावर लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपचार असून, कोविड लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जि.प.आरोग्य सभापती तथा, उपाध्यक्षा कमल जालिंधर बुधवत यांनी केले आहे.
गतवर्षी विदर्भातील पहिला कोरोना बळी हा बुलडाणा जिल्ह्यात गेला होता. दरम्यान, वर्षअखेर (२०२०) बऱ्यापैकी कारोनाची स्थिती आटोक्यात आली होती. मात्र, नव्या वर्षात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने आढळून येत आहेत. ग्रामीण जनतेला आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाचीही त्याला भक्कम साथ लाभत आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे कोविड लसीकरणाची सुविधा सुरू झालेली आहे, शिवाय १०३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांवर लवकरच व्यापक स्वरूपात लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे. ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी, तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी शासनाच्या निर्देशानुसार कोविड लस घ्यावी, असे आवाहन जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती कमल जालिंधर बुधवत यांनी केले आहे.