लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील वैरागड येथील वैरागड संग्राहक तलाव पुर्णत्वास जावा व त्याचे काम सुरू व्हावे यासाठी आमदार राहुल बोंद्रे यांनी विधान भवनात चालविलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतरही प्रश्न मार्गी लागत नसल्याने याप्रकरणी आ.बोंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने २ ऑगस्ट रोजी विधानभवनात झालेल्या चर्चेत वैरागड संग्राहक तलावाचे काम सुरू होण्याबाबतचा अर्ज विधान भवनाच्या विनंती अर्ज समितीकडे सादर करण्याचे अध्यक्षांनी मान्य केले आहे. त्यामुळे हा अर्ज अध्यक्षांच्या मार्फत विनंती अर्ज समितीकडे सादर केला जाईल. विशेष म्हणजे अशा प्रकारे विनंती अर्ज समितीकडे अर्ज सादर करण्याची विधान भवनाची या अधिवेशनातील ही पहिलीच बाब आहे.वैरागड येथील संग्राहक तलाव लोकहीतास्तव महत्वाचा असताना यासाठी शासनाकडे लोकांनी केलेली विनंती व पत्रव्यवहार संबंधीत मतदार संघाचे जनप्रतिनिधी असलेले आमदार राहुल बोंद्रे यांनी केलेली विनंती व पत्रव्यवहार या प्रश्ना संदर्भात केलेली निवेदने, सभागृहात ताराकींत व अ ताराकींत प्रश्न, लक्षवेधी सुचना, औचित्याचा मुद्या, अर्धा तास चर्चा, अशा विविध मार्गाने विधानभवनात शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रकरण निकाली लागत नसल्याने आमदार आ.बोंद्रे यांनी विधानभवन विनंती अर्ज समितीकडे वैरागड संग्राहक तलावाचे प्रकरण अर्जाव्दारे उपस्थित करून सभागृहात हे प्रकरण पटलावर ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार २ ऑगस्ट रोजी यावर सविस्तर चर्चा होवून वैरागड संग्राहक तलावाचे प्रकरण निधी उपलब्ध होवून काम सुरू होण्यासाठी, विधान भवनामार्फत हा अर्ज विनंती अर्ज समितीकडे विधानसभा अध्यक्षामार्फत सादर करण्याचे सभागृहात मान्य करण्यात आले. दरम्यान आ.बोंद्रे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे प्रकरण उपस्थित केले होते. त्यावर पावसाळी अधिवेशनात हे प्रकरण पटलावर घेवून चर्चा करण्यात आली. सभागृहाने या संदर्भातील आ.बोंद्रे यांची विनंती मान्य करून त्यानुसार विनंती अर्ज समिती मार्फत वैरागड संग्राहक तलावासाठी निधी मागणी केली आहे. या अर्जामुळे वैरागड संग्राहक तलावाला निधी प्राप्त होण्याची प्रक्रीया तात्काळ सुरू होईल व वैरागड संग्राहक तलावाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तर विधीमंडळात एखादया प्रकरणावर अशा प्रकारे विनंती अर्ज समितीकडे सभागृहाने शिफारस करून अर्ज सादर करण्याचे प्रकार तुरळक स्वरूपात येतात. आ.बोंद्रे यांनी वैरागड संग्राहक तलावासाठी अशा प्रकारे अर्ज सादर करून व त्याला विधान भवनाची मान्यता अर्ज सादर करण्याची ही या अधिवेशनातील एकमेव घटना आहे. हे विशेष.
करडी धरण गळतीची दुरूस्ती होणार चिखली मतदार संघातील करडी या धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या धरणाच्या सांडव्याचे पायामधून, मार्गदर्शक भिंतीमधून आणि स्वयंचलीत गेटमधून गतवर्षी मोठया प्रमाणावर पाणी गळती झाल्याचे निर्दशनास आले होते. यामुळे उन्हाळयात पाण्याचे संकट ओढवले होते. याबाबत आ.बोंद्रे यांनी ताराकींत प्रश्नाव्दारे सभागृहाचे लक्ष वेधून उपाय योजने संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी दिलेल्या लेखी उत्तरात पाणी गळती झाल्याचे मान्य करीत गळती रोखण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
चिखलीतील मुख्य रस्त्यांसाठी ५0 कोटीची मागणी चिखली शहरातील रस्त्याची सध्या अतिशय दुरावस्था झालेली असून जागोजागी पडलेले मोठ-मोठे खड्डे, वेगवेगळया कामासाठी रस्त्याचे झालेले खोदकाम व पावसाळयात रस्त्यावर साचणारे पाणी यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. ही बाब विधानसभेत औचित्याच्या मुद्याव्दारे आ.राहुल बोंद्रे यांनी उपस्थित करून सद्य परीस्थीतीबाबत सभागृहाला अवगत करून देत, चिखली शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यासाठी शासनाने तातडीने ५0 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दयावा अशी आग्रही मागणी केली आहे.