- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डीएड् व बीएड् झालेल्या बेरोजगारांची संख्या राज्यात लाखोंच्या घरात आहे. या भावी शिक्षकांची पात्रता तपासण्यासाठी गेल्या सात वर्षामध्ये सहावेळा टीईटी घेण्यात आली आहे. पहिल्या वर्षी टीईटी दिलेल्यांची आता मुदत संपूष्टात आलेली आहे. आतापर्यंत टीईटी निकालाचा टक्का वाढला नसून, केवळ पाच ते दहा टक्केच निकाल लागत आहे.शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी आवश्यकतेनुसार किमान एकदा घेण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्राची वैधताही सात वर्षांची असते. गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी या परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येते. मात्र टीईटी उतीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराची पात्रता ही सात वर्षांसाठीच असते.पहिली टीईटी ही २०१३ मध्ये घेण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या वर्षी टीईटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या टीईटी प्रमाणपत्राची मुदत आता संपली आहे. टीईटीमध्ये प्राथमिक व माध्यमिक असे दोन स्तर करण्यात आले आहेत.
टीईटी धारक संभ्रमातज्या उमेदवारांनी टीईटी दिली नाही किंवा अनुत्तीर्ण झाले ते शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्र समजले जात नाहीत. त्यामुळे २०१३ मध्ये ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेवारांना नियमाप्रमाणे आता पुन्हा टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार का, याबाबत अद्याप कुठल्याच सुचना आलेल्या नाहीत. त्यामुळे टीईटीधारकही सध्या संभ्रमात आहेत. कोरोना विषाणु संसर्गामुळे सध्या टीईटी होण्याची शाश्वती कमीच आहे.
दोन्ही वर्षाचा निकाल कमीच!राज्यात सात लाखावर डीएड्, बीएड्धारक बेरोजगार आहेत. मागील वर्षी सहा लाखांवर उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी जवळपास १ लाख ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ३ लाख ५३ हजार पैकी १६ हजार ५९२ शिक्षक उर्त्तीण झाले आहेत.