बुलडाणा : आपले संपूर्ण आयुष्य साहित्य, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीत समर्पित केले, अशा लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्र शासनाने शासकीय स्तरावर साजरे करावे, अशी मागणी आंबेडकरी साहित्य अकादमी बुलडाण्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
बहुजन समाज हा शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी वामनदादा कर्डक यांनी काव्य, पोवाडा, गजल, अभंग, भारूड आणि मुक्तछंद, अशा विविध प्रकारांतून जनजागृती केली. संपूर्ण महाराष्ट्रात वामनदादा कर्डक यांना लोकशाहीर म्हणून ओळखतात. असे प्रबोधनकार व आंबेडकरी चळवळीचे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष शासकीय स्तरावर साजरे करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आंबेडकर साहित्य अकादमीच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, उपाध्यक्ष सुरेश साबळे, सचिव विलास सपकाळ, कोषाध्यक्ष सुदाम खरे, सदस्य सर्वश्री मंजूश्री खोब्रागडे, शाहीर रमेश दादा आराख, संतोष ढाले, शशिकांत इंगळे, अमोल पैठणी, रविकिरण वानखेडे, साधना चव्हाण आदींची स्वाक्षरी आहे.