खामगाव (बुलढाणा) : संस्थानमध्ये येणाऱ्या भाविकांना शिवीगाळ केल्याने जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील संत सुपोजी महाराज संस्थान परिसरात असलेले प्रसादाचे दुकान संस्थेच्या विश्वस्त मंडळाने बंद केले, याचा राग आल्याने दुकानचालकाने विश्वस्तांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेबाबत संस्थानचे व्यवस्थापक अरूण वसंत देवकर यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये संस्थानच्या परिसरात नितीन गोपाळ कोकाटे याचे प्रसादाचे दुकान होते. तो भाविकांना दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याने त्याचे दुकान विश्वस्तांनी बंद केले. याबाबत नितीन कोकाटे याने बुधवारी सकाळी दारू पिऊन येत व्यवस्थापक देवकर यांना जाब विचारला. त्याला दारू पिऊन शिवीगाळ केल्याचे म्हणताच त्याने उपस्थितांना शिवीगाळ केली.
जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता मंदिराच्या दरवाजावर दगड मारला, तर प्रसादाच्या दुकानातील विद्युत दिवा फोडून टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी आरोपी नितीन कोकाटेविरूद्ध भादंविच्या २९४, ४२७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.