धाड : काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाभरात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. भाजीपाला विक्रीही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. भाजीपाला उत्पादकांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.
देऊळघाट सरपंचपदासाठी माेर्चेबांधणी सुरू
बुलडाणा : अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील सदस्य नसल्याने देऊळघाट ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले हाेते. काेराेनामुळे सरपंचपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली हाेती. आता ही निवडणूक ३ मार्च राेजी हाेणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी माेर्चेबांधणी सुरू केली आहे.
माेताळा येथील स्मशानभूमीची स्वच्छता
माेताळा : स्वच्छतेची शिकवण देणारे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तळणी येथे मातंग समाजबांधव महाराष्ट्र राज्य संघटना माेताळा यांच्या वतीने माेताळा शहरातील स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम अंभाेरे यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबवण्यात आले. यावेळी कपिल साेमण, संजय हिवाळे, गजानन वानखडे आदींसह इतर उपस्थित हाेते.
नादुरुस्त कालव्यातून पाण्याचा अपव्यय
अंढेरा : बुलडाणा लघुपाटबंधारे विभागांतर्गंत येणाऱ्या शिवणी आरमाळ येथील धरण देऊळगाव राजा सिंचन शाखेच्या अखत्यारीत आहे. या धरणावरून उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे पाणी साेडण्यात येते. मात्र, कालव्यांची दुर्दशा झाल्याने पाण्याचा अपव्यय हाेत आहे.
डेंग्यूसदृश आजाराचा रुग्ण आढळला
साखरखेर्डा : काेराेना रुग्ण वाढत असताना सिंदखेड राजा तालुक्यातील सावंगी भगत येथे डेंग्यूसदृश आजाराचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावातील एका मुलाला गत काही दिवसांपासून ताप येत हाेता. त्याची तपासणी केली असता त्याला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वीज कर्मचाऱ्यांविरुद्ध वाढला राेष
धामणगाव बढे : वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वीजदेयकांची वसुली सुरू झाली आहे. आधीच लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले आहेत. त्यात, महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीजकनेक्शन कापण्याची धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांविरुद्ध राेष वाढला आहे.
विद्यार्थी उपस्थिती भत्त्यावरील स्थगिती हटवावी
बुलडाणा : विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यावर शासनाने काेराेनाचे कारण समाेर करून स्थगिती दिली आहे. ही स्थगिती हटवण्याची मागणी शिक्षक परिषदेने राज्य शासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
खासगी डाॅक्टरांचा सेवा बंद करण्याचा इशारा
जानेफळ : आराेग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना काेविशिल्ड लस देण्यात येत आहे. लाेणार तालुक्यातील खासगी डाॅक्टरांना अजूनही लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे, लसीकरण न केल्यास सेवा बंद करण्याचा इशारा खासगी डाॅक्टरांनी दिला आहे.
साखरखेर्डा येथे दाेन दिवस कडकडीत बंद
साखरखेर्डा : काेरेानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता साखरखेर्डा येथे शनिवार आणि रविववारी कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन ठाणेदार जितेंद्र आडाेळे यांनी केले आहे. शनिवारी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली हाेती.
दुकानदारांना काेराेना चाचणी बंधनकारक
लाेणार : तालुक्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, कोविड नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गंत दुकानदारांची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तालुक्यातील दुकानदारांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे.