बुलडाणा: कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च ते जून दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे, सर्वसान्याबराेबरच भाजीपाला उत्पादक शेतकरीही संकटात सापडले हाेते. या काळात शासनाने सुरू केलेली द्वारपाेच याेजना शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनाही दिलासा देऊन गेली.
कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. नंतर टप्प्याटप्पयाने त्यात शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूू मिळविण्यासाठी मोठे हाल झाले होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अनुषंगिक विषयान्वये नियोजन करण्यात आले होते. प्रारंभीच्या काळात प्रामुख्याने शहरी भागात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे नागरी भागातील जवळपास ९५ ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा नागरिकांना चांगला आधार मिळाला. जिल्ह्यातील १, २६४ शेतकऱ्यांची व ४६ शेतकरी गटांची भूमिका महत्त्वाची राहली होती. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले माल कृषी विभागाच्या सहकार्याने थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमातंर्गत द्वारपोच या भाजीपाल्याची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे उत्पादक ते थेट ग्राहक अशी साखळीच या कालावधीत जिल्ह्यात निर्माण झाल्याचे चित्र झाले होते.
त्यानुषंगाने संबंधितांना लॉकडाऊन काळात पासेसही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुसरीकडे काही ठिकाणी कृषी विभागाच्या सहकार्याने टरबुज व अन्य फळांचीही विक्री करण्यात आली होती. त्याचा थेट ग्राहकांना फायदा झाला. काही शेतकरी गटांनी ट्रॅक्टरद्वारे थेट ग्राहकापर्यंत पोहेचून त्यांना फळविक्री केली होती.
त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही या १,२६४ शेतकऱ्यांचे व ४६ शेतकरी गटातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र गतिमान झाले होते.
शेतकरी करतात थेट विक्री
कृषी विभागाच्या या याेजनेतून शेतकऱ्यांना शेतमालाला चांगला भाव मिळाला. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची हाेणारी लूट थांबली. त्यामुळे, लॉकडाऊन संपल्यानंतरही शेतकऱ्यांनी भाजीपाला, टरबूज, खरबुज विक्री सुरू केली आहे. टॅक्टरमध्ये माल भरून शेतकरी दिवसभर शहरातील विविध भागात विक्री करीत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भावही मिळत असल्याचे चित्र आहे.