बुलडाणा, दि. १५- एसएससी व एचएससी परीक्षेच्यावेळी बहुतांश परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्तीची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाशी संलग्न असलेल्या विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, नागपूरच्यावतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. एसएससी व एचएससी परीक्षावेळी ग्रामीण भागातील बहुतांश परीक्षा केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात कॉपी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत असल्याचे दिसून येते आहे. काही ठिकाणी तर शिक्षकसुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगतात. परीक्षेत कॉपी करू देण्याच्या वृत्तीचे दुरूगामी परिणाम कनिष्ठ महाविद्यालये व ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांवर होत आहे. शहरातील परीक्षा केंद्रावर कॉपी करू दिली जात नाही, त्यामुळे शहरातील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात ग्रामीण भागातील कॉपी परीक्षा केंद्रावर प्रवेश घेत असल्यामुळे शहरातील अनेक अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर अथवा योग्य पटसंख्येअभावी अतिरिक्त होण्याच्या मार्गावर आहेत. या पृष्ठभूमीवर बुलडाणा येथील विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनच्यावतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील परीक्षाकें द्र घेण्याकडे विद्यार्थ्यांचे जास्त आकर्षण असते. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाची अंमलबाजवणी कडक व्हावी, यासाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. -प्रा. शिवराम बावस्कर,जिल्हाध्यक्ष, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, बुलडाणा.
विदर्भ टिचर्स असोसिएशन राबवणार ‘कॉपीमुक्त अभियान’!
By admin | Published: January 16, 2017 1:10 AM