खामगाव, दि. 29 - शेगाव येथील रिक्षाचालक मेहबूब शहा सलग पाचव्या वर्षी लोणार ते शेगाव पायी वारी करित असून त्यांना गजानन विजय ग्रंथातील अनेक ओव्या मुखोद्गत आहेत. त्यामुळे सातासमुद्रापार पोहचलेल्या श्रींच्या भक्तीला आता धर्माचेही बंधन उरलेले नसल्याची प्रचिती येत आहे.
श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असून शनिवार २९ जुलै रोजी पालखीचे खामगावात आगमन झाले. सदर पालखीमध्ये शेगाव येथील कविमनाचे रिक्षाचालक मेहबूब शहा यांचाही सहभाग दिसून आाला. त्यांच्याशी संवाद साधला असता मेहबूब शहा यांनी श्रींच्याविषयी त्यांच्या मनातील भक्तिभाव कथन केला. शेगाव रेल्वे स्टेशनवर रिक्षाचालक असणारे मेहबूब शहा हे भाविकांना संत गजानन महाराज मंदिर येथे पोहचून देण्याचे काम करतात. त्यामुळे ते स्वत:ला श्री संत गजानन महाराज व भाविकांमधील दुवा असल्याचे सांगतात. संत गजानन महाराजांविषयी श्रद्धा कशी काय निर्माण झाली याबद्दल विचारणा केली असता मेहबूब शहा म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी गजानन महाराज हे अवलिया असल्याचे सांगितल्यापासूनच माझ्या मनात त्यांच्याविषयी भक्तिभाव रुजू झाला व ती उत्तरोत्तर वाढत गेली. सन २०१३ पासून आपण लोणार ते शेगाव पायदळ वारी गजानन महाराजांच्या पालखीसोबत करित आहोत असे सांगून त्यांनी गजानन विजय ग्रंथातील काही ओव्याही म्हणून दाखविल्या. सदर पालखी सोहळ्याच्या स्वागताप्रीत्यर्थ स्थानिक हनुमान व्हीटामिन येथे आयोजित महाप्रसादाचा लाभ घेवून ते पालखी सोबत पुढील प्रवासाकरिता रवाना झाले.मी माझ्या धर्मात खुश आहे पण सर्वच माणसे आपली आहेत. सर्वांना आपले माना असा संदेश जाता-जाता त्यांनी दिला