ऑनलाइन लोकमत
देऊळगावराजा, दि. 4 - तालुक्यातील जळपिंपळगाव शेत शिवारातील शेतात शिका-याने लावलेल्या जाळ्यात अडकल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रूवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. जळपिंपळगाव येथे वनकर भालेराव वाघ यांच्या शेतात बिबट्या शिकारीच्या जाळ्यात अडकला, अशी बातमी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पसरतातच नागरिकांनी शेताकडे धाव घेतली.
यानंतर तत्काळ वन विभागाच्या अधिका-यांना माहिती देण्यात आली. मात्र, वन विभागाची चमू चार तास उशीरा पोहोचला. जखमी असलेला बिबटया तोपर्यंत जाळ्यातच अडकून राहल्याने त्याचा मृत्यू झाला. चार तासानंतर वनविभागाचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर गावक-यांनी काही वेळ बिबट्याचे शव घेवून जाणा-या अधिका-यांना अडवले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
अखेरीस सिंदखेडराजा पोलिसांनी गावक-यांची समजूत काढून बिबट्याचे शव हलविण्यात आले. मादी बिबटयाचे दोन छावे सध्या या परिसरात असल्याची माहिती गावक-यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसापासून गावक-यांनी वनविभागाच्या अधिका-यांकडे वारंवार या परिसरात बिबट्या फिरत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवर वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत होते.
https://www.dailymotion.com/video/x844qeb