ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि.२१ - दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीमध्ये शेतक-यांची एकच गर्दी होत आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज १८ ते २० हजार क्विंटल सोयाबीनची आवक असून शुक्रवारी दुपारी बाजार समितीसमोर २ किमी. पर्यंत शेतक-यांनी सोयाबीन आणलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गत तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाºया शेतकºयांना यावर्षी खरिपातील सोयाबीन पिकाचे समाधानकारक उत्पन्न झाले आहे. यावर्षी उत्पन्नात वाढ झाली असली तरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तसेच खाजगी बाजारामध्ये सोयाबीनला चांगले भाव मिळत नाहीत. त्यामुळे अनेक शेतक-यांनी सध्या सोयाबीन विक्रीकरिता काढले नाहीत. दरम्यान बी-बियाणे आणि पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याकरिता तसेच दिवाळी सण तोंडावर आल्याने सोयाबीन विकल्याशिवाय शेतक-यांकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे अनेक शेतकरी बाजार समितीकडे सोयाबीनची विक्री करीत आहेत.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुलडाणा जिल्ह्यासह अकोला, वाशिम, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमधूनही मोठ्याप्रमाणात सोयाबीन विक्रीस येते. दिवाळीचा सण जवळ आल्याने गत तीन दिवसांपासून सोयाबीनची आवक मोठ्याप्रमाणात वाढली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच विविध जिल्ह्यांमधून सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतक-यांची बाजार समितीमध्ये गर्दी दिसून आली आहे. विशेष म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत बाजार समितीपासून अकोला-खामगाव मार्गावर २ कि.मी. पर्यंत सोयाबीन असलेल्या वाहनांची रांग लागलेली होती. सोयाबीन विक्रीबाबत काही शेतकºयांचे मत जाणून घेतले असता सोयाबीनला योग्य भाव नसला तरी कर्जफेड करण्याकरिता सोयाबीनची विक्री करावीच लागत असल्याचे त्यांनी सांगितले.