- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षात गटबाजी तसेच इच्छुकांचीही संख्या अधिक असल्याने या मतदारसंघातील गुंता सुटता-सुटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणता उमेदवार ठरतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार असल्याचे निश्चित झाले आहे.शिवसेनेकडून बुलडाणा विधानसभेसाठी विजयराज शिंदे, संजय गायकवाड, जालिंधर बुधवत, धीरज लिंगाडे, डॉ. मधुसूदन सावळे असे पाच जण इच्छुक आहेत. विजयराज शिंदे यांना तब्बल पाच वेळा विधानसभा निवडणूक लढण्याचा अनुभव आहे. यापैकी त्यांनी तीनवेळा विजय मिळविला होता. तर संजय गायकवाड यांनी दोनदा निवडणूक लढविली, परंतु त्यांना एकदाही आपल्या पारड्यात यश पाडता आले नाही.२०१४ च्या निवडणुकीत त्यांनी मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. जालिंधर बुधवत, धीरज लिंगाडे व मधुसूदन सावळे या तिघांपैकी एकानेही विधानसभा निवडणुकीत आपले नशीब अजमावलेले नाही. अशा परिस्थितीत आता शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी दिल्या जाते आणि परिणामस्वरुप बंडखोरी होते की काय?, हे येत्या दोन ते तीन दिवसात स्पष्ट होईल. बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना पक्षामध्ये असलेली गटबाजी सर्वश्रुत आहे. मात्र या गटबाजीचा फटका यावेळी कोणाच्या पथ्थावर पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
vidhan sabha 2019 : शिवसेनेतील गटबाजीने वाढला गुंता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:56 PM