- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदारांनी प्रस्थापितांना नाकारत सात मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्या पृष्ठभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाला ‘हादरे’ बसतात तर कोणाला पुन्हा ‘संधी’ मिळते याबाबत सध्या राजकीय वर्तुळात गणिते मांडली जात आहेत. त्यातच युतीमधील वाढता गुंता पाहता जागा वाटपाच्या निर्णायक क्षण येण्यास अद्यापही दोन ते तीन दिवसांचा अवकाश आहे. त्यामुळे काही इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.सध्या भाजप, शिवसेना या पक्षांची चांगलीच चलती असल्याने या दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील सात विधानसभांसाठी भाजपने घेतलेल्या मुलाखतीसाठी तब्बल ६४ जणांनी हजेरी लावली होती. एकट्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून नऊ जण इच्छूक होते तर सिंदखेड राजा व चिखलीतूनही अनेक जण इच्छूक होते. शिवसेनेचा विचार करता एकट्या बुलडाण्यासाठी तब्बल ३२ जणांनी मुंबईतील शिवसेना भवनाची पायरी चढून मुलाखतीची तयारी पूर्ण केली होती. अगदी चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या काही इच्छुकांनही बुलडाण्यासाठी मुलाखती दिल्या होत्या. मात्र अद्याप युतीचा गुंता न सुटल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा वृद्धींगत झालेल्या अनेक इच्छुकांची चलबिचल सुरू आहे.भाजपच्या दृष्टीने खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोदमधील उमेदवार निश्चत असून गेल्या पाच वर्षाच्या काळात विद्यमान आमदारांनी आपला प्रभाव कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीमध्ये खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला मिळालेले ३३ हजार २७९ आणि ३६ हजार ९८४ मताधिक्य हे जमेची बाजू ठरणारे आहे.दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजयराज शिंदे, काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा, ध्रृपदराव सावळे, रेखाताई खेडकर यांना पराभवाचे हादरे बसले होते तर खामगावात अॅड. आकाश फुंडकर, बुलडाण्यात हर्षवर्धन सपकाळ आणि सिंदखेड राजामध्ये डॉ. शशिकांत खेडेकर या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली होती.ही स्थिती पहता १४ व्या विधानसभा निवडणुकीत कोणाला हादरे बसतात आणि कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे. काहीजण ‘वंचीत’च्या उंबरठ्यावर असल्याचीही जिल्ह्यात चर्चा आहे.
यंदा निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार१४ व्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. अनेकांच्या महत्त्वाकांक्षा उंचावलेल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर १४ वी विधानसभा जिल्ह्यात काही नवी समिकरणे निर्माण करते की काय? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यातच १२ व्या विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर २०१४ च्या निवडणुकीत १०१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ८१ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती. २०१९ ची निवडणूकही विविध कारणांनी अभूतपूर्व ठरणार आहे. त्यामुळे १४ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात कोणती समिकरणे उदयास येतात याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठणी आहे. मात्र निवडणुक रिंगणातील उमेदवारांचे यंदा पुन्हा शतक गाठल्या जाण्याची शक्यता आहे.