- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गैरवर्तवणुकीला आळा घालण्यासाठी शिक्षक आणि पोलिसांचे दक्षता पथक गठीत करण्याचा पहिला प्रयोग तीन वर्षापूर्वी बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे कामाच्या पद्धतींमध्ये बदल झाले आहेत. राज्यात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातच पोलिस व शिक्षकांचे दक्षता पथक थंडावल्याचे चित्र आहे. मुलं-मुली पळून जाण्याच्या घटना वाढत असताना मुलींच्या सुरक्षेच्यादृष्टीने कार्य करणाºया पथकांकडून शाळा-महाविद्यालयात प्रबोधनाचे कार्य होताना दिसून येत नाही. राज्यात पोलिस विभागाकडून कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसोबत संवेदनशीलता जपत महिला व मुलींना सुरक्षाव्यवस्था पुरवली जाते. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी व अत्याचाराचा निपटारा होण्यासाठी सर्व आयुक्तालय व जिल्ह्यांमध्ये घटक प्रमुखांच्या नियंत्रणाखाली मुख्यालयाच्या ठिकाणी महिला साहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांना निर्धास्तपणे बाहेर व शाळेत जाता याव, यासाठी शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक आणि पोलिस प्रशासनाच्या विद्यमाने महिला छेडछाड विरोधी दक्षता पथक गठित करण्याचा यशस्वी प्रयोग गेल्या तीन वर्षापूर्वी राबविण्यात आला होता. राज्यात हा पहिलाच प्रयोग होता. या पथकाकडून शाळा-महाविद्यालयीन मुला-मुलींचे प्रबोधन करणे, गैरवर्तवणूक करताना आढळलेल्या मुला-मुलींना पालकांसमोर सौम्य शिक्षा व त्यांच्याकडून पुन्हा तसे गैरवर्तन होणार नाही, यासाठी समुपदेशन करण्याचे काम केले जात होते. त्यावेळी असलेले जिल्हा पोलिस अधिक्षक श्यामराव दिघावकर व उपविभागीय पोलिस अधिकारी समिर शेख यांच्या संकल्पनेतून प्रथमच बुलडाण्यात २० लोकांच्या दक्षता पथकाचा प्रयोग राबविण्यात आला होता. बुलडाण्यातील दक्षता पथकामध्ये पोलिसांच्या चिडीमार विरोधी पथकाच्या प्रमुख योगीता भारद्वाज, सहाय्यक पोलिस निरिक्षक मनिषा राऊत, पथक प्रमुख प्रभाकर वाघमारे यांच्यासह इतर सदस्यांचाही समावेश होता. परंतु अधिकारी बदलल्यानंतर जिल्ह्यातील दक्षता पथकाचे कामही संपल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींना पुळवून नेण्याच्या घटना वाढल्या असताना अशा पथकांची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने होत असताना मुलींना स्वयंसरक्षणाचे धडे देणे, प्रबोधन करण्याचे काम अद्याप हाती घेण्यात आले नाही.
मुलींना तक्रार पेट्यांचा आधार
मुलींना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी शाळा-महाविद्यालयात तक्रार पेट्या बसविण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शहराच्या ठिकाणी दक्षता पथकाची गाडी फिरताना दिसून येते. मात्र या पथकाच्या कारवाह्या नाममात्र स्वरूपात दिसून येतात. ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयाच्या ठिकाणी दक्षता पथक महिती नसल्याने मुलींना केवळ तक्रार पेट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या छोडछाड व विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी पायी पेट्रोलिंग, शाळा कॉलेजच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महिला व विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या पोलिस दक्षता पथकाकडून अनेकांना न्याय मिळाला. मात्र आता वरिष्ठ अधिकारी बदलून गेल्याने पोलिस प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य मिळत नाही. त्यामुळे दक्षता पथकाच्या मोहीमेचे काम बंद केले आहे. - प्रभाकर वाघमारे, कार्याध्यक्ष, पोलिस दक्षता पथक, बुलडाणा.