खामगाव (जि. बुलडाणा) : ग्रामपंचायतीच्या निवडणूक शपथपत्रात न्यायप्रविष्ट प्रकरणाची माहिती न दिल्याने मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवर विजयी झालेल्या उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील विजयी उमेदवार बळीराम सारोकार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला आहे.बळीराम सारोकार यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर येथीलच समीर सारोकार यांनी आक्षेप घेतला. त्यामध्ये बळीराम यांच्याकडे ग्रामपंचायतीचा कर थकीत असून, भादंविच्या कलम ३०७ नुसार दाखल गुन्ह्याचे प्रकरण खामगाव न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद केले. ही माहिती बळीराम यांनी शपथपत्रात नमूद केली नाही. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज रद्द केला. त्याला बळीराम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने ४ जानेवारी रोजी अंतरिम आदेश देत न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून त्यांना निवडणूक लढण्यास मंजुरी दिली. तर या मंगळवारी अंतिम सुनावणीत बळीराम यांनी शपथपत्रात माहिती लपविल्याचे पुढे आले.
गुन्हा लपविल्याने विजयी ग्रा.पं. उमेदवाराचे सदस्यत्व रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 06:47 IST