- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : ग्रामीण स्वच्छतेची व्याती वाढविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर नावाजलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अंमलबजावणी नवीन मार्गदर्शन सूचनेनुसार महाराष्ट्र दिनी १ मे पासून बुलडाणा जिल्ह्यात करण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील ८७३ ग्रामपंचायती सहभाग घेणार असून यावर्षीपासून उत्कृष्ट प्रभागास १० हजार तर उत्कृष्ट जिल्हा परिषद गट ग्रामपंचायतीस ५० हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८७३ ग्रामपंचायतीमध्ये रस्सीखेच होणार असून अभियानाचा महाराष्ट्र दिनी बिगुल वाजणार आहे.
राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेची सवय लावून संपूर्ण गाव स्वच्छता करून आरोग्याचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी यावर्षी सन २०१८-१९ साठी नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी ग्रामपंचायत १ मे रोजी महाराष्ट्र दिनी अभियानाची घोषणा करणार असून १५ मे पर्यंत अभियानाची पूर्वतयारी करणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व संबंधितांची सभा तालुकास्तरावर आयोजित करणार आहेत. यावेळी खासदार, आमदार, जि.प.सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, सेवाभावी संस्था, प्राध्यापक, स्वातंत्र सैनिक यांना निमंत्रित करून अभियानाबाबत मार्गदर्शन करून सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत.तर १६ ते ३१ मे दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसभा आयोजित करून अभियान यशस्वी करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहेत. यावेळी अभियानामध्ये सक्रीय काम करण्यासाठी कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार असून वैयक्तीक शौचालयाची स्थिती, वैयक्तीक स्वच्छता, धनकचरा, व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि परिसर याबाबत आढावा घेण्यात येणार आहे.१ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान ग्रामपंचायतीतील प्रत्येक प्रभाग उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेकरीता जास्तीत जास्त गुण मिळविण्याची तयारी करणार आहे. तर १ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायत उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यावेळी स्पर्धेच्या तपासणीसाठी गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतस्तरावर तपासणी समिती गठित करून निकषाप्रमाणे उत्कृष्ट प्रभागाची निवड करणार आहे. त्यानंतर १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान गटविकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर उत्कृष्ट प्रभाग स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या उत्कृष्ट प्रभागाचा सत्कार सोहळा व पुरस्कार वितरण कार्यक्रम घेवून १० हजाराचे बक्षीस प्रदान करणार आहेत. या १० हजाराचा विनियोग संबंधित ग्रामपंचायतीने उत्कृष्ट प्रभागातील विकासकामासाठी करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर १ ते ३१ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद गटातील समाविष्ट ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी संबंधित गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून निकषानुसार जास्त गुण प्राप्त करणाºया ग्रामपंचायतीची निवड करून प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीचे नाव ३१ जानेवारी पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करतील. तर या अभियानअंतर्गंत १ ते ३१ जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद गट स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गुण प्राप्त करणाºया ग्रामपंचायती जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तयारी करतील. तर १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीची तपासणी, १ ते ३१ मार्च दरम्यान स्पर्धेतील जिल्हास्तरावरील प्रथम, व्दितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीची तपासणी व १ ते ३० एप्रिल दरम्यान विभागस्तरीय प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकप्राप्त ग्रामपंचायतींचा सत्कार सोहळा व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तर १ जुलै ३१ आॅगस्ट दरम्यान राज्यस्तरीय तपासणी समितीकडून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीची तपासणी करून २ आॅक्टोबर रोजी राज्यस्तराववर बक्षीसाचे वितरण करण्यात येणार आहे.