ओमप्रकाश देवकर
मेहकर : कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याकरिता तालुक्यातील काही गावांची निवड करण्यात आली आहे. वरूड या गावामध्ये ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र येथील समितीबाबत तक्रारी होत असल्याने सर्वसामान्य शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत़ कृषी विभागाने यावर उपाययाेजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
निवड झालेल्या गावांतील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावांमधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करण्याच्या दृष्टीने गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठी तसेच प्रकल्पांतर्गत हाती घ्यावयाच्या कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी कृषी विभागास साहाय्य करण्याकरिता गावातील कृषी व ग्रामीण विकास क्षेत्राशी संबंधित असलेल्या १३ व्यक्तींचा ग्राम कृषी संजीवनी समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात येताे. वरूड येथे ही समिती २१ जुलै २०२१ रोजी स्थापन करण्यात आली आहे. या समितीबाबत सरपंच यांनी गावातील सर्व नागरिकांना याबाबत अवगत करून ऑनलाइन पद्धतीने एकूण १३ लोकांची निवड या समितीमध्ये केली आहे. या वेळेस या समितीवर कुणीही आक्षेप न घेतल्यामुळे ही समिती कायम करण्यात आली. मात्र वरूड येथील काही ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी या समितीवर आक्षेप घेत सदर समिती ही नियमबाह्य पद्धतीने स्थापन करण्यात आली आहे. ही समिती स्थापन करताना ग्रामसभा बोलावण्यात आली नाही. सामान्य जनतेमधून समितीतील उमेदवारांची निवड करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़
ग्रामसभा घेऊन समितीची निवड करा
वरूड हे गाव आदिवासी असून या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक राहतात. त्यांच्याकडे स्वतःचा मोबाइल नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना ऑनलाइन पद्धतीची माहिती नाही. त्यामुळे सदर समिती ही कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ग्रामसभा घेऊनच निवडण्यात यावी. तोपर्यंत सदर समिती ही अधिकृत न समजता बेकायदेशीर समजण्यात यावी, अशी विविध कारणे देत ही समिती बरखास्त समजण्याची मागणी वरूड येथील ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पवार, ज्योती रवींद्र पवार, कलावती चव्हाण, दारासिंग राठोड, माणिक पवार, रमेश पवार प्रकाश पवार, सविता पवार, विजय पवार यांच्यासह इतर ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे केली आहे.
ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करताना सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले आहे. गावांमध्ये सर्वांना सांगून समितीची निवड करण्यात आली आहे. कोरोना असल्याने प्रत्यक्ष ग्रामसभा न बोलाविता ऑनलाइन पद्धतीने समिती स्थापन केली आहे. या वेळी सर्वं अधिकारी उपस्थित होते.
अतुल महादेव वानखेडे, सरपंच, वरूड
या समितीमध्ये योग्य व प्रगतशील लोकांची निवड न झाल्याने समिती बरखास्त करण्यात यावी, याकरिता वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला आहे.
- तुकाराम पवार, ग्रामपंचायत सदस्य, वरूड
अनेक प्रकरणे प्रलंबित
वरूड हे गाव पोखरा अंतर्गत येत असल्याने या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या इतर योजनेतून योजनांचा लाभ मिळत नाही. येथे समितीच वादग्रस्त असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे शेतकरी योजनेपासून वंचित राहत असल्याने या प्रकरणाचा तत्काळ निपटारा व्हावा, अशी मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहेत.