मलकापूर : येथून जवळच असलेल्या लोणवाडी गावातील पाणी पुरवठा गेल्या १५ ते २0 दिवसांपासून विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यामध्ये वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतने यावर उपाययोजना न केल्याने अखेर काल सकाळी लोणवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घातला.लोणवाडी गावाला मोरखेड १0 गावे पाणीपुरवठा योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या १५ ते २0 दिवसांपासून या गावचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्याकरिता ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने काल संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर जावून गोंधळ घालीत ग्रामसेवक, सरपंच यांना घेराव घातला. यावेळी ग्रामसेवक पाचपांडे यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक पाचपांडे यांच्यावर कार्यवाही करुन त्यांना निलंबीत करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली.याबाबतची माहिती तहसीलदार रविंद्र जोगी यांना व राष्ट्रवादी काँग्रेसची सरचिटणीस तथा या सर्कलच्या जि.प.सदस्या सौ.मंगला रायपुरे यांचे पती संतोषराव रायपुरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी लोणवाडी येथे भेट दिली. यावेळी सरपंच गजानन बावस्कर, माजी सरपंच अनिल भारंबे, तुळशीराम वाघ, वसंता बावस्कर, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलिस पाटील, ग्रा.पं.सदस्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामस्थांचा ग्रामपंचायतला घेराव
By admin | Published: July 20, 2014 11:32 PM