- अनिल उंबरकार
शेगाव - प्रलंबित रस्त्याच्या मागणीसाठी शनिवारी एकफळ येथील शेकडो ग्रामस्थांनी चिल्यापिल्यांसह चिखल तुडविला. या अनोख्या आंदोलनामुळे शेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शेगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एकफळ येथे रस्ताच नाही. त्यामुळे या ग्रामस्थांच्या नशीबी स्वांतत्र्यपूर्व काळापासून वनवास सुरू आहे. पावसाळ्यात रस्त्याची समस्या गंभीर होत असल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. चिखल तुडवित शाळेत जावे लागते. परिणामी, अनेकांना मनस्ताप होतो. याबाबत वारंवार निवेदन देवूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधी आश्वासनापलिकडे काहीच करीत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या एकफळ वासियांनी शनिवारी चिखल तुडवित अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात शिवरतन परदेशी, दुर्गासिंह लोधी, बाबुलाल परदेशी, देवानंद वानखडे, कैलास पाटील, दिनकरराव देशमुख, संजय देशमुख, भिकनराव देशमुख, रविंद्र वानखडे, आनंदराव देशमुख, हिंमतलाल परदेशी, अशोक कराळे, पंजाबराव देशमुख, साहेबराव देशमुख, अॅड. कमलेश लोधी, किसनलाल परदेशी यांच्यासह आदींचा समावेश आहे.
८०० मीटरच्या रस्त्यासाठी संघर्ष!
शेगाव ते आळसणा पर्यंतरस्ता डांबरीकरण आहे. आळसणा ते कुरखेड पर्यंत ८०० मीटर लांबीच्या रस्याचे काम स्वातंत्र्यापासून प्रलंबित आहे. वेळोवेळी ग्रामस्थांनी निवेदन , आंदोलने केलीत. रस्त्यासाठी एकफळ - सांगवा , कुरखेड , आळसणा ग्रामपंचायती मार्फत ठराव सुध्दा दिलेले आहेत. या भागाचे लोकप्रतिनिधी पासून ते जिल्हाधिकारी, सा. बा. विभाग , मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना निवेदने पाठविलेले आहे. मात्र काहीही उपयोग होत नाही. संबधितांना विचारले की रस्त्यासाठी भूसंपादन बाकी असल्याचा सांगितले जाते.