सिंचन क्षेत्रासाठी खडकपूर्णा धरण अग्रगण्य मानले जाते; परंतु बुडीत क्षेत्रांमध्ये येणारी गावे सुविधांपासून वंचित आहेत. या परिसरात विद्युत पुरवठा करता येत नाही. बुडीत क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गारगुंडी, मेहुणा राजा, टाकरखेड भागीले, सिंनगाव जहागीर, वाणेगाव, देऊळगाव महीचा काही परिसर, चिंचखेड पूर्व आणि पश्चिम, सुलतानपूर, खल्याळ गव्हाण, बायगाव खुर्द, ईसरूळ, मंगरूळ, मंडपगाव आणि इतर काही गावे येतात. या प्रकल्पबाधित बुडीत क्षेत्रामध्ये दोन हजार हेक्टर सिंचन क्षेत्र आहे; परंतु निर्धारण अहवालानुसार विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे या प्रकल्पबाधित गावाचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
धरण उशाला कोरड घशाला
बाधित क्षेत्रातील शेतकरी आणि रहिवाशांची अवस्था धरण उशाला कोरड घशाला, अशी झाली आहे. या भागात सिंचनासाठी पिण्याचे पाणी पाणीपुरवठा आणि शेती सिंचनासाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शीलाताई शिंपणे यांनी निवेदनाद्वारे पाटबंधारे विभाग बुलडाणा यांच्याकडे केली आहे.