कोराेनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भाग प्रतिबंधित क्षेत्र तर ग्रामीण भागातही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र सामान्य नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. अनेक जण अकारण आणि विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. मधल्या काळात घसरणीला लागलेला कोरोना आता पुन्हा तालुक्यात डोके वर काढत आहे.
दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला, गिरण्या, फळांची दुकाने, अैाषधी दुकाने सकाळी आठ ते तीन या कालावधीत सुरू राहतील असे आदेश आहेत. मात्र या आदेशाचेही येथे सर्रास उल्लंघन होत आहे.
गुरूवारी मेहकर शहरातील मुख्य रस्ता, जानेफळ मार्ग, माँ जिजाऊ चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील दुकाने सुरू होती.
पालिका व पोलीस प्रशासनातर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असली तरी त्याचे सातत्य वाढविण्याची गरज आहे. सुरू असलेल्या काही दुकानामध्ये कोरोना प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या नियमांचेही योग्य पद्धतीने पालन होत नसल्याचे चित्र आहे.