पाेकरा अंतर्गत ३५४ शेतकऱ्यांना लाभ
बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील ३५४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. जिल्ह्यातील ४१३ गावांमधील शेतकरी या प्रकल्पांतर्गत सुखी, समृद्ध हाेण्यास मदत झाली आहे.
अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा
सिंदखेड राजा : तालुक्यातील ग्रामीण भागात गत काही दिवसापासून अवैध दारू विक्री माेठ्या प्रमाणात सुरू आहे. दारु विकत घेण्यासाठी बाहेरगावातील लाेक गर्दी करीत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भीती आहे. त्यामुळे अवैध दारु विक्री बंद करण्याची मागणी हाेत आहे.
सुतारकाम करणाऱ्यांना आर्थिक मदत द्या
साखरखेर्डा : लाॅकडाऊनमुळे सुतारकाम करणाऱ्या कारागिरांवर आर्थिक संकट आले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सुतार व्यवसाय करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. कामे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
पार्किंगची व्यवस्था करा
बुलडाणा : प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कार्यालये आहेत. इमारत परिसरात पार्किंगची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारक कुठेही आपली वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी संदीप गायकवाड यांनी केली आहे.
खरीप पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
धामणगाव बढे : खरीप हंगाम संपून पाच महिने लोटले असताना सुद्धा व शेतकऱ्यांचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे असताना पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना कवडीची सुद्धा मदत पीक विमा कंपनीकडून झाली नाही. शासन स्तरावरसुद्धा कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही.
ढगाळ वातावरणाचा उन्हाळी पिकांना फटका
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत असल्याने उन्हाळी पिकांचे नुकसान हाेत आहे़ काही गावांमध्ये पाऊस ही झाल्याने टरबूज, खरबूज पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़
काेराेना राेखण्यासाठी समित्या स्थापन करा
धामणगाव बढे : माेताळा शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी गावागावांत समित्यांची स्थापना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हाेत आहे.
इंधन वाढल्याने वाहनचालक त्रस्त
धामणगाव धाडः पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने, वाहनचालक वैतागले आहेत. वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सामान्य वाहनधारकांचे बजेट कोलमडल्याचे दिसत आहे.
रिक्त पदांमुळे विकासकामे रखडली
बुलडाणा : विविध विकासकामे ही बांधकाम विभाग शिवाय हाेणे शक्य नाही. या विभागात ३५ अभियंत्यांच्या भरवशावर १,१०० पेक्षा अधिक गावांचा डाेलारा उभा आहे. पंचायत समित्या आणि सहा उपविभागीय कार्यालयात ही पदे रिक्त आहेत.
सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव
लोणार : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभाव असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची कुचंबणा होते. अस्तित्वात असलेले सार्वजनिक शौचालय सोयीसाठी उघडे करून देण्यात यावे, अशी मागणी वैभव गाडे यांनी केली आहे.
बायपास मार्ग बनला पांदण रस्ता
जानेफळ : गावाबाहेरून असलेला बायपास मार्ग खराब होऊन जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने जड वाहने बायपास मार्गाऐवजी गावातूनच जात आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बायपास मार्गाची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा रस्ता पांदण रस्ता बनल्याचे चित्र आहे.