तीन हजार हेक्टरवर साेयाबीनची पेरणी
डोणगाव : परिसरात यावर्षी तीन हजार हेक्टवर साेयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिके धाेक्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
५५ हजारांवर विद्यार्थी झाले उत्तीर्ण
जानेफळ : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मेहकर तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. अभ्यासासाठी दिवस-रात्र एक केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. तालुक्यातील ५५ हजार १०८ विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले आहेत.
ग्रामस्थांसाठी केली पेयजलाची व्यवस्था
किनगावराजा : येथील सेवानिवृत्त सैनिक विलास पांडुरंग काकड यांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय देत स्वतःच्या शेतातून स्वखर्चाने गावकऱ्यांकरिता पेयजलाची व्यवस्था केली. देशसेवेतून निवृत्त होऊनही समाजसेवेकरिता घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचा प्रश्न प्रलंबित
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये गेल्या वर्षभरात अनेक विहिरी खचल्या आहेत. या विहिरींचे प्रस्ताव मग्रारोहयोंतर्गत दुरुस्तीकरिता पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत.
जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे खचलेल्या विहिरींचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून धूळ खात पडले आहेत.
बियाणाचा तुटवडा; शेतकरी संकटात
अमडापूर : कोरोनाच्या संकटाला तोंड देत शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत. शेतीची मशागत करून महागडे खते, बी-बियाणाच्या खरेदीसाठी शेतकरी तडजोड करीत आहेत. बॅंकेचे पीककर्ज, खासगी कर्ज काढून शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. परंतु सध्या सोयाबीन बियाणाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट निर्माण झाले आहे.