हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. १६ : बुलडाण्यासह राज्यातील विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातील घोटाळाप्रकरणी मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांना बुलडाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. मात्र, चौकशीदरम्यान आमदार रमेश कदम यांची व्हीआयपी व्यवस्था करण्यात आली असून, महागड्या हॉटेलमधील जेवण देण्यात येत आहे.मोहोळ येथील आमदार रमेश कदम हे ऑगस्ट २0१२ ते डिसेंबर २0१४ या काळात महामंडळाचे अध्यक्ष असताना, महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी त्यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हय़ाच्या आधारे सप्टेंबर २0१५ मध्ये महासंचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत कदम यांनी इतर सदस्यांच्या मदतीने ३८५ कोटींचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले होते. महामंडळाचा निधी वापरण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याद्वारे मिळालेला निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरला, असेही तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी आमदार कदम यांना १७ ऑगस्ट २0१५ रोजी अटक केल्यानंतर प्रकरणाशी संबंधित इतरांना अटकही करण्यात आली. तेव्हापासून ते पोलिसांच्याच ताब्यात आहेत. अशा प्रकारचा घोटाळा बुलडाणा येथील अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातही करण्यात आला असून, अनेकांना धनादेशाद्वारे कर्जाचे मंजुरी आदेश काढलेले असल्याचे प्रकरण दाखल झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थींना आ. रमेश कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता पैसे मंजूर केले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून, बुलडाण्यातील घोटाळ्याशी कशाप्रकारे आमदार रमेश कदम यांचा संबंध आहे. याची चौकशी करण्यासाठी पुणे येथील सीआयडी पथकाने आमदार कदम यांना १३ ऑगस्ट रोजी न्यायालयात उभे केले. यावेळी न्यायालयाने अधिक चौकशीसाठी आरोपी आमदार कदम यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र चौकशीदरम्यान आरोपी रमेश कदम यांची व्हीआयपी व्यवस्था करण्यात आली आहे. अशाप्रकारे केली ह्यव्हीआयपीह्ण व्यवस्थाआरोपी आमदार रमेश कदम यांना चौकशीदरम्यान व्हीआयपी व्यवस्था करण्यात आली आहे. चौकशीसाठी आलेल्या सीआयडी पथकासाठी बुलडाणा-चिखली रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये चार एसी रूम बुक करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आरोपी आमदार रमेश कदम यांची आंघोळीची व्यवस्था करण्यात आली असून, इतर कैद्याप्रमाणे जेवण न देता, त्यांच्यासाठी विशेष डबा मागविण्यात येत आहे. या डब्यात सकाळ-संध्याकाळ त्याच्या आवडीनुसार मांसाहारी मेनू असल्याचेही समजते.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या बुलडाणा जिल्हा कार्यालयात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी रमेश कदमसह बुलडाणा जिल्हा कार्यालयातील काही अधिकार्यांची बंदद्वार चौकशी करण्यात आली. सदर चौकशी कोणत्या ठिकाणी, कोणत्या अधिकार्यांशी, किती वेळ चर्चा झाली, याबाबत माहिती मिळाली नाही.
आरोपी आमदाराची कोठडीत व्हीआयपी व्यवस्था
By admin | Published: August 17, 2016 2:46 AM