बुलडाणा : भारताचे जलपुरुष, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी २२ मे रोजी बाराही महिने पाण्याची टंचाई आणि टँकरफिल्ड असलेल्या सावळा गावाला भेट दिली. सावळ्यात एकमेव असलेल्या विहिरीची, परिसरातील पाणीस्रोत व जलसंधारणासाठी उपयुक्त ठरणार्या परिसराची त्यांनी पाहणी केली. कायम पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या या गावाचे हे संकट दूर करण्यासाठी योग्य ठिकाणी सिंचन तलाव व बंधार्याची निर्मिती करण्याची गरज असल्याचे सांगून यासाठी जिल्हा प्रशासनालाही त्यांनी दोन साईट सुचविल्या. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे गाव सावळा हे कायम बाराही महिने पाणी टंचाईग्रस्त गाव आहे. तुपकरांनी या संदर्भात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांना माहिती दिली असता त्यांनी रविकांत तुपकरांसह प्रत्यक्ष गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. सावळा येथे एकमेव विहीर असून, या विहिरीत टँकरद्वारे किंवा पाईपलाईनच्या सहाय्याने पाणी सोडले जाते. या एकाच विहिरीवरून सर्व नागरिक पाणी नेतात. डॉ. राजेंद्रसिंह यांनी या विहिरीची पाहणी केली. तसेच गावाच्या परिसरात, गावाशेजारील डोंगर, दर्या आणि पाणथळ जागा अशी पाहणीदेखील त्यांनी केली. यावेळी तहसीलदार दीपक बाजड, भूजल सर्वेक्षण अधिकारी प्रवीण कथने यांच्यासह इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. लघुसिंचन विभागाच्या वतीने या गावाच्या परिसरात प्रत्येकी १२ लक्ष रुपये खर्चाचे तीन बंधारे निर्माण करण्यात आले आहे; परंतु या बंधार्यांचा कोणताही उपयोग होताना दिसून येत नाही. पाण्याऐवजी या बंधार्यांमध्ये पैसाच जिरला असल्याचे मत डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. तसेच बंधारा बनविण्यापूर्वी योग्य जागेची निवड करणे आवश्यक असते. यासाठी त्यांनी स्वत: परिसराची पाहणी करून तहसीलदार दीपक बाजड यांना सिंचन तलावासाठी २ नवीन साईट सुचविल्या. नागरिकांच्या सहभागाशिवाय कोणतेच काम यशस्वीरित्या पूर्णत्वास जाऊ शकत नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव व जाणीव असल्याने राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने गावागावांमध्ये नागरिकांना एकत्रित करून जलक्रांतीचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले.
जलतज्ज्ञांची सावळा गावाला भेट
By admin | Published: May 25, 2015 2:29 AM