लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम: विवेकानंद आश्रमाच्या सर्वच उपक्रमांना विश्वस् तांनी शुकदास महाराजांच्या पश्चातही त्यांच्या उपदेशाप्रमाणे चालू ठेवावे व समाजसेवेचा हा वटवृक्ष विस्तारत जावा, अशा शब्दात बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी विवेकानंद आश्रमास भेट दिली व आश्रमाच्या विविध संस्था, सेवाकार्य व उपक्रमाची पाहणी केली. या पाहणीनंतर ते आश्रमाच्या सेवाकार्याने प्रचंड भारावून गेल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी विश्वस्त मंडळाशी संवाद साधत मार्गदर्शनही केले. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी, उ पाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी त्यांचे स्वागत केले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कविता, गोशाळेच्या माध्यमातून गायींचे होत असलेले संवर्धन, गोरगरिबांच्या मुला-मुलींना देण्यात येणारे उच्च दर्जाचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण अशा सर्वच उपक्रमाची जिल्हाधिकार्यांनी पाहणी करून अगदी आस्थेने चौकशी केली. विद्यार्थी वर्गाशीही संवाद साधला. जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्यासोबत मेहकरचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
जिल्हाधिकार्यांकडून आश्रमाच्या कार्याचे कौतुकजिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी विवेकानंद आश्रमाच्या अभ्यागत नोंदणीकेत आपला अभिप्रायही नोंदविला. त्यामध्ये जिल्हाधिकार्यांनी नमूद केले की, विवेकानंद आश्रमाकडून अनेक समाजोपयोगी उपक्रम उत्कृष्ट पद्धतीने राबविले जात आहेत. विशेषत: गोशाळा खूप श्रद्धापूर्वक जाणिवेतून चालवली जात आहे. दिव्यांग मुलांच्या शाळेस भेट दिली. सर्वच मुले खूप उत्साही, सकारात्मक प्रतिसाद देणारी असल्याचे दिसून आले. आश्रमाच्या सर्वच उपक्रमांना ट्रस्टींनी महाराजांच्या पश्चात त्यांच्या उपदेशानुसार चालू ठेवावे व समाजसेवेचा हा वटवृक्ष विस्तारत जावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महाराजांच्या पश्चात विवेकानंद आश्रमात आलेले डॉ. पुलकुंडवार हे पहिलेच जिल्हाधिकारी ठरले आहेत. यावेळी त्यांनी शुकदास महाराजांच्या समाधीचे दर्शनही घेतले व महाराजांच्या मानवसेवी कार्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून घेतली.
हरिहरतीर्थास भेट, हरिहराची पूजाविवेकानंद आश्रमाचे हरिहरतीर्थ हे ‘ब’ वर्ग तीर्थस्थळ म्हणून घोषित झालेले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी हरिहरतीर्थासही भेट दिली व हरिहराचे दर्शन घेऊन पूजाही केली. अतिशय नयनरम्य आणि पवित्र अशा या तीर्थस्थळाच्या दर्शनाने ते भारावून गेल्याचे दिसून आले. या तीर्थस्थळावर झालेल्या विविध विकासकामांची पाहणी करून त्याबद्दल जिल्हाधिकार्यांनी समाधानही व्यक्त केले. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी तीर्थस्थळी जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांचे यथोचित स्वागत केले. आश्रमाचे अध्यक्ष र तनलाल मालपाणी यांच्यासह सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त दादासाहेब मानघाले, पुरुषोत्तम अकोटकर, कैलास भिसडे व वसंतअप्पा सांबापुरे, प्रदीप पडघान हजर होते.