लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : विवेकानंद जयंती महोत्सव २ फेब्रुवारीपासून आश्रमात प्रारंभ हाेत आहे. महापंगत, स्वामीजींच्या प्रतिमेची मिरवणूक व यात्रा हे अत्यंत महत्त्वाचे व देखणे सोहळे या उत्सवातून रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाच्या परवानगीनुसार केवळ व्यासपीठावरील कार्याक्रमांनाच ऑनलाइन प्रक्षेपणाद्वारे सादर करण्याची मान्यता मिळाली आहे. संस्कृतचे अभ्यासक व चिंतनकार निवृत्तीनाथ येवले शास्त्री व थुट्टे शास्त्री यांच्या गीता चिंतनाने मंगळवारी महाेत्सवास सुरुवात हाेणार आहे. विवेकानंद आश्रमाचा गायकवृंद व औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध गायक प्रा. गजानन केचे यांचे अनुभूती गायन, श्रीरंग महाराज वाहेगावकर यांचे प्रवचन, शिवचरित्रकार गजाननदादा शास्त्री महाराज यांचे व्याख्यान, दुपारी विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ यांचे हरिकीर्तन, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे व डॉ. चारूदत्त आफळे पुणे यांचे व्याख्यान तर शेवटी वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे यांचे हरिकीर्तनाने दिवसभराच्या कार्यक्रमांचा समारोप हाेणार आहे. विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यात होणारी ही मोठी वैचारिक चळवळ असून, शुकदास महाराजांनी सुरू केलेला हा वारसा समाजाचे वैचारिक भरण पोषणासाठी व सुज्ञ समाज निर्माण होण्यासाठी निश्चितच फलदायी ठरणार आहे.
घरुनच महाेत्सवात सहभागी हाेण्याचे आवाहन विवेकानंद आश्रम आज ५० विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे. आश्रमाचे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्यांना आपली वाटणारी व जनकल्याणासाठी आपल्या सर्वशक्तीचा वापर करणारी संस्था असे असून, वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक संकटांना समाजासोबतच शासन, प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारी धर्मादाय संस्था आहे. यावर्षीच्या उत्सावात आपण सामिल न होता घरीच राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ माध्यमांद्वारे घ्यावा, असे आवाहनही विवेकानंद आश्रमाद्वारे करण्यात आले आहे.