लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आगामी लोकसभा निवडणूकीत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी स्वयंसेवक नेमले जाणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात शुक्रवारी गटविकास अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, अपंग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर ने आण करण्याची व्यवस्था, अंधांसाठी ब्रेल लिपीतील व्होटर स्लिप व निवडणूक मतदान कार्ड, फर्निचर सुविधा इत्यादीचा विभागीय आयुक्तांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. मतदान केंद्रावर वरील सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नोडल अधिकाºयांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यात लोकशाही भिंत हा उपक्रम सर्व सार्वजनिक ठिकाणी राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यामध्ये नगर पालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत व शाळा या ठिकाणांचा समावेश राहणार आहे.जिल्हा परिषदेत लोकशाहीच्या भिंतीचे उदघाटन विभागीय आयुक्तांनी त्यावर संदेश लिहून केले. जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मतदानासाठी जनतेला प्रवृत्त करण्यासाठी रोज मतदान होईपर्यंत निवडणूकीसंदर्भात बॅच बिल्ले वापरणार आहेत. यासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी पूर्ण जिल्ह्यात प्रभातफेरी, पथनाट्य, मतदाना जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. सर्व मतदान केंद्रावर मेडीकल कीट उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मूगराजन एस., जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उप विभागीय अधिकारी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. लोखंडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
मतदान केंद्रांवर नेमले जाणार स्वयंसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 2:19 PM